किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४२ वा राज्याभिषेक दिन सोहळा मोठय़ा उत्साही वातावरणात साजरा झाला. वेदातील मंत्रोच्चार, शंखनाद, ढोलताशे आणि पोवाडय़ाच्या गजरात महाराजांना मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने देशभरातील ५ हजारांहून अधिक शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते.
 मुंबई, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यांसह राज्याच्या अन्य भागांतून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. दोन दिवस हा सोहळा रायगडावर रंगला होता. किल्ल्यावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर लेझर प्रकाश योजना या वेळचे वैशिष्टय़ ठरले. शनिवारी शिरकाई देवीच्या पूजनाने या सोहळ्याला प्रारंभ झाला. जगदीश्वर पूजन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महाराजांच्या मूर्तीचे तुलादान करण्यात आले.
   रविवारी सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पंचामृत, सप्तगंगा स्नान, अभिषेकानंतर महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली.