देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या दोन हजाराच्या वर गेली आहे. सोमवारी ३५२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ही संख्या २३३४ इतकी झाली आहे. देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. करोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६० वर पोहोचली आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं आहे. आवश्यक असल्यास बाहेर पडलात तर मास्क लावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट आहे. तिथेही प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेतली आहे.

Live Blog

21:30 (IST)14 Apr 2020
महाराष्ट्रात आणखी ३५० करोनाग्रस्त पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २६८४, दिवसभरात १८ मृत्यू

महाराष्ट्रात ३५० आणखी करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या २६८४ झाली आहे. दिवसभरात करोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज जे १८ मृत्यू झाले त्यातले ११ मृत्यू मुंबईत झाले आहेत. ज्या १८ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी १२ पुरुष रुग्ण होते आणि सहा महिला आहेत. १८ पैकी ११ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातले आहेत. १८ पैकी १३ रुग्णांना मधुमेह, ब्लड प्रेशर, अस्थमा, हृदयरोग असे विकार होते

21:12 (IST)14 Apr 2020
रायगड मधील करोना बाधितांचा आकडा ३२ वर

रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा ३२ वर पोहोचला आहे. यात पनवेल महानगर पालिका हद्दीतील २६ तर उलवे परिसरातील ४  तर उरण मधील २ जणांचा समावेश आहे. यातील तिघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. चार जण करोनामधून पुर्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

20:44 (IST)14 Apr 2020
"लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही.. परप्रांतीयांनी घाबरु नये"

लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही. परप्रांतीय कामगारांनी, मजुरांनी अजिबात घाबरुन जाऊ नये असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परप्रांतीय मजुरांना दिलासा दिला. आज वांद्र्यात जे काही घडलं ते काही लोकांनी पिल्लू सोडल्यामुळे घडलं असेल. त्यामुळे अनेकांना वाटलं असेल की आजपासून ट्रेन सुरु होतील आणि आपल्याला घरी जाताल येईल. पण मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की तुम्ही घाबरुन जाऊ नका आणि मुंबई सोडू नका. महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांच्या पाठिशी उभा आहे. महाराष्ट्रात तुम्ही सुरक्षित आहात. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हिंदीतूनही या सगळ्यांशी संवाद साधला आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

20:43 (IST)14 Apr 2020
करोनाचा लढा महाराष्ट्र गांभीर्याने लढतो आहे-उद्धव ठाकरे

आपली करोनासोबतची लढाई सुरुच आहे, आधी विषमतेसोबत होती आता विषाणूसोबत आहे. या लढाईत सगळेच उतरले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत वाढवला आहे याबाबत मी त्यांना धन्यवाद देतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एकूणच काय तर परिस्थिती कितीही आपल्या हातात आली असली नसली तरीही आपण हा लढा गांभीर्याने घ्यायला हवा आणि आपण तो घेतला आहे.आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनेच आपण नक्की जिंकणार आहोत हा आत्मविश्वास मला आहे. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात काहीही विचित्र सुरु नाही हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतं आहे.

20:14 (IST)14 Apr 2020
मालेगावमध्ये पाच नवे करोनाबाधित

मालेगावामध्ये आज पाच नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. हे पाचही जण करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. या सर्वांना क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे.

19:45 (IST)14 Apr 2020
संजय निरुपम म्हणतात वांद्र्यात जे घडलं ते होणारच होतं कारण..

वांद्र्यात दुपारच्या सुमारास हजारोंचा जमाव स्टेशनबाहेर जमला होता. आम्हाला घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडा अशी मागणी करत या सगळ्यांनी ठिय्या दिला होता. अखेर पोलिसांनी या सगळ्यांची समजूत काढली. सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला. करोनाशी लढण्यासाठी लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र मुंबईतील कामगारांचा संयम सुटलेला पाहण्यास मिळाला. यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे.

18:52 (IST)14 Apr 2020
वांद्रे स्टेशनबाहेर हजारोंची गर्दी जमेपर्यंत पोलीस काय करत होते? -किरीट सोमय्या

वांद्रे स्टेशनबाहेर हजारोंची गर्दी जमेपर्यंत पोलीस काय करत होते? असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. सरकारने अत्यंत प्रभावीपणे रेशन पुरवण्याचे, निवारा पुरवण्याचे काम करावे म्हणजे असे प्रकार घडणार नाहीत असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोक जमले होते. आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी ट्रेन सुरु करा अशी मागणी त्यांनी केली होती. हजारो लोक जमेपर्यंत पोलीस काय करत होते? सरकार काय करत होतं? तासाभरात एवढे लोक जमले कसे काय? असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत.

18:50 (IST)14 Apr 2020
मुंबईत दिवसभरात 11 जणांचा बळी, 204 नवे करोनाबाधित

मुंबईत आज दिवसभरात करोनाने 11 बळी घेतले असून 204 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकुण आकडा 1हजार 753 वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या 111 जणांचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

18:40 (IST)14 Apr 2020
वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव, लॉकडाउनचा कडाडून विरोध

वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला आहे. लॉकडाउनचा विरोध करत अनेक कामगार हे गावी जाण्यासाठी हटून बसले आहेत. हजारो लोकांनी जमून गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी केली. लॉकडाउनची मुदत आजच वाढवण्यात आली आहे. मात्र लोकांचा संयम सुटल्याचे यामध्ये दिसून आले. वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोक जमून लांब पल्याची गाड़ी सोडण्याची मागणी करत होते. आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे कामगार असून अधिकतर यूपी, बिहारचे होते. पोलिसांनी सध्या जमाव पांगवला आहे.

17:59 (IST)14 Apr 2020
श्रीलंकेत अडकलेल्या पुणेकराची आर्त हाक

करोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी विमानसेवा बंद करण्यात आलेली असल्याने त्यांच्याकडे प्रवासाचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळेच पुन्हा मायदेशी परतण्यासाठी हे भारतीय केंद्र आणि राज्य सरकारांकडे मदत मागत आहे. असेच एकूण ८० भारतीय श्रीलंकेत अडकले असून २० ते २५ महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये पुण्यातील एका तरुण आहे. आपली मदत करावी अशी आर्त हाक या तरुणाने केंद्र आणि राज्य सरकारला दिली आहे. (सविस्तर वृत्त)

16:52 (IST)14 Apr 2020
करोना व्हायरसवर ‘रेमडेसिविर’ ठरु शकते गेमचेंजर औषध

करोना व्हायरसवर आणखी एक औषध प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग असे या औषधाचे नाव आहे. इबोला साथीच्या आजाराच्यावेळी या औषधाचा वापर करण्यात आला होता. वाचा सविस्तर बातमी.

16:48 (IST)14 Apr 2020
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही – अमित शाह

अन्न, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढला तरी कोणी चिंता करण्याची आवश्यकता नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. त्यांनी धनिक, श्रीमंत वर्गाला आसपास राहणाऱ्या गरीबांना मदत करण्याचे आवाहन केले.

16:17 (IST)14 Apr 2020
धोका वाढला! देशातील करोना मृत्यूंमध्ये दर दुसरा मृत्यू महाराष्ट्रात

महाराष्ट्रात आणि देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसंच करोनामुळे देशभरात ३३९ मृत्यू झाले आहेत. मात्र यामध्ये काळजीची बाब ही की करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दर दुसरा मृत्यू महाराष्ट्रात होतो आहे. महाराष्ट्रात २४५५ रुग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे. ३३९ पैकी १६० मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातले आहेत. तसंच या १६० पैकी १०१ मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी आहे. 

15:57 (IST)14 Apr 2020
“नरेंद्र मोदींनी राहुल गांधींचा सल्ला ऐकायला हवा होता”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींनी दिलेल्या सूचना ऐकायला हव्या होत्या असं मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी रोजी आर्थिक संकट उद्भवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कोणतीही काळजी घेण्यात आली नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

15:46 (IST)14 Apr 2020
दादरमधील पोलीस इमारत सील

करोनाचं संकट आता पोलिसांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलं आहे. दादर येथील नायगाव पोलीस मुख्यालयातील एका इमारतीतील पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे ही इमारत सील करण्यात आली आहे. इमारत सील केली असल्याने इमारतीत वास्तव्यास असणारे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध लादण्यात आले असून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (सविस्तर वृत्त)

15:19 (IST)14 Apr 2020
पुण्यात तीन जणांचा मृत्यू

पुण्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे करोनाबाधित रूग्णांबरोबरच मृतांची संख्या वाढली आहे.  

15:12 (IST)14 Apr 2020
मदतकार्याच्या फोटोवर राज ठाकरे झाले नाराज

करोनाचा उपद्रव झाल्यानंतर देशात सर्वच क्षेत्रातील आर्थिक स्थिती चिंताजनक होत चालली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे सगळ्यांना घरात राहावं लागत आहे. या स्थिती हातावर पोट भरणाऱ्या आणि घरापासून दूर अडकलेल्यांना मदत करण्यासाठी लाखो हात समोर आले आहेत. ही मदत करताना सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या चुकीच्या कृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

14:36 (IST)14 Apr 2020
करोनाचे आणखी १२१ रुग्ण पॉझिटिव्ह, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २४५५

१२१ करोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळल्याने महाराष्ट्राची रुग्णसंख्या २४५५ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २३३४ होती. त्यामध्ये १२१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २४५५ झाली आहे. 

14:34 (IST)14 Apr 2020
‘नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरुन डाव्या कुशीवर वळली..’ सलील कुलकर्णींची अंतर्मुख करणारी पोस्ट

काय आहे सलील कुलकर्णींची पोस्ट?

नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त……

माझ्या एक एक तासाची किंमत आहे असं उर्मट चेहऱ्याने सांगणारे ……

पुढच्या महिन्यात फोन करून पाहा…हा महिना तर अगदी ओव्हर पॅक आहे म्हणणारे……

पुढच्या दोन महिन्यात सहा देशांत फिरणार आहे असं मिरवणारे….

तुला बघुन घेतो मी ,तुझ्या गावात येऊन घरात घुसतो असा दम भरणारे….

मी फोन उचलत नाही हो…सतत meetings असतात ऑफिस मध्ये आमच्या.. असा दावा करणारे……

माझ्या एका हाकेवर दहा हजार लोक जमा होतील असं गरजणारे …

दर काही दिवसांनी ऑफिस ची टूर आहे सांगून बाहेरख्याली पणा करून फसवणारे…

सगळे थांबले…शांत….एका रांगेत..
तोंड झाकून…
अंतर राखून

नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त……

14:31 (IST)14 Apr 2020
औरंगाबादमध्ये करोनाचा आणखी एक बळी

औरंगाबाद शहरात करोनामुळे आज आणखी एक बळी गेला आहे. करोना लागण असलेल्या ६८ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. आतार्यंत शहरात करोनामुळे दोघांचा मृत्यूू झालेला आहे. तर शहरातील बाधितांचा आकडा 24 वर पोहचला आहे.

14:19 (IST)14 Apr 2020
जाणून घ्या चीन कशाप्रकारे घेतोय जागतिक मंदीचा फायदा?

करोनानं सध्या जगभरात थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जग या संकटाशी सामना करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे चीनसारखा देश जगभरात पसरलेल्या आर्थिक मंदीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी चीननं दक्षिण चीन महासागरात युद्ध सराव केला होता. त्यानंतर आता चीननं आपला मोर्चा कच्च्या तेलाकडे वळवला आहे. चीनच्या कच्च्या तेलाच्या आयातीत तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

14:18 (IST)14 Apr 2020
उपकाराची परतफेड? अमेरिका भारताला देणार घातक हारपून मिसाइल आणि टॉरपीडोस

ट्रम्प प्रशासनाने सोमवारी अमेरिकन काँग्रेसला भारताला हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल आणि टॉरपीडोसची विक्री करणार असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. हा एकूण व्यवहार १५ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर्सचा आहे. भारत अमेरिकेकडून दहा एजीएम-८४एल हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल विकत घेणार आहे. वाचा सविस्तर बातमी.

14:18 (IST)14 Apr 2020
उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'करोना' समितीची स्थापना

राज्यावरील करोनाच्या संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन करोनाचा नायनाट करणं, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रभावी उपायोजना करणार आहे.

13:07 (IST)14 Apr 2020
विमान सेवा ३ मे पर्यंत राहणार बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

13:01 (IST)14 Apr 2020
लॉकडाउननंतर गाडयांची विक्री वाढेल, मारुतीला विश्वास

करोना व्हायरसचे संकट वरदान ठरु शकते अशी वाहन उद्योग क्षेत्राला आशा आहे. करोनाचे संकट निर्माण होण्याआधीपासून वाहन उद्योग क्षेत्र मंदीचा सामना करत आहे. लॉकडाउन संपल्यानंतर वाहन विक्रीमध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ शकते असे मत मारुती सुझुकीचे चेअरमन आर.सी.भार्गव यांनी व्यक्त केले. वाचा सविस्तर बातमी.

12:21 (IST)14 Apr 2020
महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांचा आकडा गेला अडीच हजारांवर

राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली. राज्यात नव्यानं १२१ रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं असून एकूण संख्या २ हजार ४५५ इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

12:10 (IST)14 Apr 2020
रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला करोनाची लागण, तबलिगींमुळे संसर्ग झाल्याचा संशय

रत्नागिरीत एका सहा महिन्यांचा बाळाला करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. रत्नागिरी शहरापासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या साखरतर गावात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबातीला बाळाला करोनाची लागण झाली आहे. याच कुटुंबातील महिलेला करोनाची लागण झाली होती. यानंतर बाळाची तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तबलिगी जमातशी संबंधित काहीजण गावात आले होते, त्यातून बाळाला संसग्र झाला असावं असा संशय व्यक्त केला जात आहे. (सविस्तर वृत्त)

11:29 (IST)14 Apr 2020
…म्हणून मोदींनी ३० एप्रिल ऐवजी ३ मे पर्यंत वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घोषणा करताना देशभरातील लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे तारीख का निवडली असावी. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी सार्वजनिक सुट्टी असते. २ तारखेला शनिवार आणि ३ तारखेला रविवार असल्यानेच नरेंद्र मोदींनी ३ मे ही तारीख निवडली आहे.

11:29 (IST)14 Apr 2020
सोशल डिस्टन्सिंगमध्ये १.५ मीटर अंतर पुरेसे आहे का? संशोधक म्हणतात…

सध्याच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्वाचे आहे. करोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यावर भर दिला जात आहे. पण सुरक्षित अंतर नेमके किती असले पाहिजे? अलीकडेच एका अभ्यासात या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. बेल्जियम आणि डच संशोधकांनी एयरोडायनामिक प्रभाव लक्षात घेऊन हा अभ्यास केला. वाचा सविस्तर बातमी.

11:28 (IST)14 Apr 2020
…तो विचार करुन अंगावर काटा येतो: मोदी

करोनाचा फैलावर रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनचा आज शेवटचा दिवस असतानाच पंतप्रधान मोदींनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली. याचवेळी बोलताना त्यांनी इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये खूप चांगली परिस्थिती असल्याचे सांगितले. यावेळी इतर देशांशी तुलना करताना भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करुन अंगावर काटा येतो असंही मोदींनी यावेळी सांगितलं.येथे वाचा सविस्तर वृत्त

11:27 (IST)14 Apr 2020
अर्थव्यवस्थेचं नुकसान? सर हाजिर तो पगडी पचास; मोदींचा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जतनेशी संवाद साधला. करोनाचा फैलावर रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनचा आज शेवटचा दिवस असतानाच पंतप्रधान मोदींनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली. याचवेळी बोलताना त्यांनी अर्थव्यवस्थेला झालेले नुकसान आणि सामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा उल्लेखही केला. मात्र या लॉकडाउनमुळे चुकवायला लागलेली किंमत ही भारतीयांच्या जीवापेक्षा मोठी नाही, असंही मोदी यावेळी म्हणाले.येथे वाचा सविस्तर वृत्त

10:25 (IST)14 Apr 2020
मोदींनी सांगितली सप्तपदी

- घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या, ज्यांना आधीपासून आजार आहेत, त्यांच जास्त काळजी घ्या.
- लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं पालन करा
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा, पाणी यांचे सेवन करा.
- करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाइल अॅप डाऊनलोड करा.
- शक्य असेल तितक्या गरीब कुटुंबांजी काळजी घ्या,
- तुमचा व्यवसाय, उद्योग असेल तर संवेदना ठेवा नोकरीवरुन काढू नका.
- देशातील करोना योद्धयांचा सन्मान करा, त्यांचा गौरव करा

10:21 (IST)14 Apr 2020
तर २० एप्रिलपासून या ठिकाणी लॉकडाउन शिथील होणार - मोदी

पुढील एक आठवडा लॉकडाउनचे नियम कठोर करणार. प्रत्येक जिल्ह्यावर बारकाईने नजर ठेवणार. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाच मूल्यांकन केलं जाणार, जे करोनाला आळा घालतील तिथे नियम थोडे शिथिल केले जातील. लॉकडाउनचे नियम मोडले. करोना तुमच्या भागात पोहोचला लगेच परवानगी मागे घेतली जाईल. उद्या सरकारकडून विस्तृत गाईडलाइन जारी केली जाईल.

10:15 (IST)14 Apr 2020
तीन मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा

भारतात तीन में पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आपल्याल तीच शिस्त पाळायची आहे. माझी सर्व देशवासियांना प्रार्थना आहे. कुठल्याही परिस्थिती आपल्याला करोनाला आता दुसऱ्या क्षेत्रात पसरु द्यायचे नाही. करोनामुळे कुठलाही मृत्यू झाल्यास चिंता वाढली पाहिजे.

10:11 (IST)14 Apr 2020
लॉकडाउनचा देशाला मोठा फायदा झाला - पंतप्रधान

भारताच्या तुलनेत इतर देशात करोनाच्या ३० टक्के जास्त केसेस आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनचा देशाला मोठा फायदा झाला. आर्थिक दृष्टीन विचार केल्यास खूप मोठी किंमत चुकवावी लागली. पण देशवासियांच्या प्राण वाचवणे महत्वाचे होते.

10:09 (IST)14 Apr 2020
समस्या दिसताच वेगाने निर्णय घेतले - पंतप्रधान मोदी

करोनाची ५५० प्रकरणे होते तेव्हाच भारताचे २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. समस्या वाढण्याचा विचार केला नाही. समस्या दिसताच वेगाने निर्णय घेऊन रोखण्याचा प्रयत्न केला. हे असे सकंट आहे ज्याची कुठल्या देशाबरोबर तुलना करणे योग्य नाही. जगातील सामर्थ्यशाली देशांमध्ये करोनाचे आकडे पाहिले तर भारतात त्या तुलनेत चांगली स्थिती आहे

10:06 (IST)14 Apr 2020
बाबासाहेबांचे विचार जगण्याची ताकद देतात

बाबासाहेबांचे जीवन आणि विचार आपल्याला प्रत्येक क्षणी आपले जीवन संकल्पशक्तीच्या जोरावर जगण्याची ताकद देत आहेत.

10:04 (IST)14 Apr 2020
तुम्ही सैनिकासारखे कर्तव्य बजावत आहात - नरेंद्र मोदी

कोणाला जेवणाचा, कोणाला येण्याजाण्याचा त्रास झाला, तुम्ही सगळयांनी हा त्रास सहन केला. तुम्ही शिस्तबद्ध सैनिकासारखे आपले कर्तव्य बजावत आहेत. मी तुम्हाला सलाम करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

09:30 (IST)14 Apr 2020
वाहन विक्रेत्यांना करोनाचा फटका; मोदींना पत्र लिहून म्हणाले, "मदत करा नाहीतर..."

भारतीय वाहन उद्योगावरील विघ्न दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. देशामध्ये करोनाचे संकट येण्याआधीपासूनच मंदीमध्ये असलेल्या वाहन उद्योगला आता करोनाचाही फटका बसला आहे. देशभरातील वाहन विक्रेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पत्र लिहिले आहे. पंतप्रधानांनी वाहन उद्योगाची परिस्थिती सुधारण्यासंदर्भात लक्ष घालावे अशी मागणी या पत्रामधून करण्यात आली आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

09:01 (IST)14 Apr 2020
करोना व्हायरसने गाठला १० हजारांचा टप्पा

करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून भारतात करोनाबाधितांची संख्या 10 हजाराच्या पुढे गेली आहे. तसंच मृतांची संख्या ३३९ वर पोहोचली आहे.