News Flash

Coronavirus Live Updates: ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’बाबत भारताचा मोठा निर्णय

भारतासह जगभरातील करोनासंदर्भातील घडामोडी जाणून घ्या एकाच ठिकाणी

करोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १९०० पेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली असून १०१९७ वर पोहोचली आहे. देशभरात ३९२ मृत्यूंची नोंद झाली आहे.

दुसरीकडे जगभरात करोनामुळे एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लागण झालेल्यांची संख्या २० लाख १५ हजार ५७१ इतकी आहे. केवळ युरोपमध्ये १० लाख तीन हजार २८४ जणांना लागण झाली असून ८४ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Live Blog
22:07 (IST)16 Apr 2020
रमझानच्या काळातही मशिदीत जाऊ नका, लॉकडाउनचे नियम पाळा-ब्रद्रुद्दीन अजमल

रमझानचा महिना येत्या आठ ते दहा दिवसात सुरु होतो आहे. या काळातही लॉकडाउनचे नियम पाळायचे आहेत. कुणीही घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने घरात थांबूनच नमाझ पढायला हवी असं आवाहन ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे प्रमुख ब्रद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे. देशावर करोनाचं संकट आहे. त्यामुळे याआधीही तुम्ही घरात थांबलात मशिदीत गेला नाहीत ही चांगली गोष्ट आहे. तसंच आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठीच लॉकडाउन आहे. रमझानच्या काळातही लॉकडाउनच्या नियमांचं पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे.

21:52 (IST)16 Apr 2020
नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील परिचरिकेला करोना

नवी मुंबईत आज दोन नव्या करोना रुग्णाची भर पडली. आता  शहरात करोनाचे एकूण ५४ रुग्ण झाले आहेत. बेलापूर येथील अपोलो रुग्णालयातील  परिचरिकेला करोना झाला  असून करावे गावातील व मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयातील कक्षसेवक असलेल्या कर्मचाऱ्याला करोना झाला आहे.त्यामुळे अपोलो रुग्णालय व करोना येथील संपर्कातील सर्वांचे अलगिकरण करण्यात आले आहे.

21:46 (IST)16 Apr 2020
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांची बदली

पुण्यातील  ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सध्या दोन जबाबदाऱ्या होत्या. उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आता ससूनच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी स्वीकारतील. विभागीय आयुक्त  डॉ.दीपक म्हैसेकर यांनी हे प्रशासकीय आदेश असल्याचे सांगितले आहे.

21:32 (IST)16 Apr 2020
करोनाच्या उपचारानंतर ससून रुग्णालयातून घरी पाठवलेल्या पहिल्या रुग्णाची नोंद

पुण्यात एकीकडे दिवसेंदिवस करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. शिवाय मृत्यूंची संख्या देखील रोज वाढताना दिसत आहे. अशावेळी आज ससून रूग्णालयात 31 मार्च रोजी करोनाची बाधा झाल्याने एक 42 वर्षीय रुग्ण दाखल झाला होता . मात्र 14 दिवसांनंतरच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्याने, आज त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

21:22 (IST)16 Apr 2020
मुंबई महापालिकेने बदलले करोना चाचणीचे नियम

मुंबईमध्ये कोरोनाव्हायरस चे थैमान सुरू आहे. अशात बृहन्मुंबई महानगरपालिकेने करोना संशयितांच्या नमुन्यांच्या चाचणी बाबतचे नियम बदलले आहेत. आता फक्त करोनाची लक्षणे (symptoms) लोकांमध्ये दिसतात त्यांची चाचणी केली जाईल. ज्या लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत (asymptomatic) त्यांच्या नमुने चाचणीसाठी (टेस्टिंग) गोळा करण्यात येणार नाहीत. हे नियम मुंबई महानगरपालिका आणि इतर सरकारी व खासगी रुग्णालयं व चाचणी केंद्रांसाठी लागू असतील.

21:15 (IST)16 Apr 2020
वर्धा : अत्याश्यावक सेवा देणाऱ्या वाहनांना वाहतूक सूट देण्याचे निर्देश

सरसकट सर्व वाहनांना अडविण्यात येत असल्याचा पार्श्वभूमीवर अत्याश्यावक सेवा देणाऱ्या वाहनांना वाहतूक सूट देण्याचे निर्देश आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्वच वाहने रोखण्यात आल्यास अत्याश्यावक सेवा कोलमडू शकते. अशी भीती आज सायंकाळी काढण्यात आलेल्या आदेशातुन व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर किराणा, भाजीपाला, औषधी, कृषी साहित्य पुरवठा साखळी व अन्य सेवा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमानवर यांनी स्पष्ट केले. अशा एकूण 25 तरतुदी असून त्रस्त झालेल्यांना यामुळे दिलासा मिळण्याची प्रतिक्रिया व्यापारी प्रतिनिधींनी दिली.

20:51 (IST)16 Apr 2020
मिरा भाईंदरमध्ये 3 नव्या रुग्णाची भर, शहरातील एकूण संख्या 52 वर

मिरा भाईंदर शहरात गुरुवारी 3 नव्या करोनाबाधित  रुग्णांची भर पडली असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णाची संख्या 52 एवढी झाली आहे

19:57 (IST)16 Apr 2020
वसई-विरारमधील करोनाची रुग्ण संख्या ६३ वर

विरार शहरात १० नव्या रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे गुरूवारी उघड झाले आहे. यामुळे शहरातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६३ एवढी झाली आहे.वसई विरार शहरातील करोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे.

18:52 (IST)16 Apr 2020
पुण्यात करोनामुळे दिवसभरात तीन मृत्यू

राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यातील करोनाबाधितांसह करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढत आहे. आज दिवसभरात पुण्यात तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहारात आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 47 वर पोहचला आहे.

18:29 (IST)16 Apr 2020
मुंबईत दिवसभरात तिघांचा मृत्यू 107 नवे रुग्ण आढळले

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात एकट्या मुंबईत तीन जणांच्या मृत्यूसह आतापर्यंत 107  नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा आता 2 हजार 043 वर पोहचला आहे.या आकडेवारीत आतापर्यंत मृत्यू झालेल्या 116 जणांचा समावेश आहे.

18:22 (IST)16 Apr 2020
देशात करोनाच्या रुग्णांची संख्या १३ हजारांजवळ, आत्तापर्यंत ४२० रुग्णांचा मृत्यू

देशात करोनाच्या रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ एवढी झाली आहे. १५१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत देशभरात करोनामुळे ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

17:34 (IST)16 Apr 2020
पती वारंवार शरीरसुखाची मागणी करतात, ‘या’ देशातील महिलांची लॉकडाउन संपवण्याची मागणी

करोनामुळे सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. दिवसभर घरात बसून राहावं लागत असल्याने अनेकजण कंटाळले आहेत. मात्र घानामधील महिलांना एका वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागत आहे. पती वारंवार शरीरसुखाची मागणी करत असल्याने येथील महिलांनी सरकारकडे लॉकडाउन संपवून पुरुषांना कामावर जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. (सविस्तर वृत्त)

17:31 (IST)16 Apr 2020
धक्कादायक: करोनाबाधिताकडून रुग्णवाहिका चालकास मारहाण, अंगावरही थुंकला

इच्छित रुग्णालयात दाखल करण्यास नकार देणाऱ्या रुग्णवाहिका चालकास एका करोनाबाधित रुग्णाकडून मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हा रुग्ण रुग्णवाहिका चालकाच्या अंगावरही थुंकल्याचा संतापजनक प्रकार मालेगावमध्ये घडला आहे. या प्रकाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित रुग्णाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

 
17:03 (IST)16 Apr 2020
देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव नाही, आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

16:47 (IST)16 Apr 2020
औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ, आणखी तीनजण करोनाबाधित

राज्यात करोनाचा प्रादर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. आज शहरात नवे तीन रुग्ण आढळल्याने औरंगाबदकरांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. तर, शहरातील करोनाबाधितांचा आकडा आता 28 वर पोहचला आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद देखील रेड झोनमध्ये आहे.

16:17 (IST)16 Apr 2020
पुण्यात आणखी दोघांचा बळी, एकूण मृत्यूचा आकडा 46 वर

पुण्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे. आज शहरातील ससून रुग्णालयात करोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. तर याचबरोबर शहरातील एकुण मृतांचा आकडा 46 वर पोहचला आहे. 

15:03 (IST)16 Apr 2020
नाशिकमधील एका महिलेससह मालेगावमधील वयस्कर व्यक्तीस करोनाचा संसर्ग

नाशिक शहरातील सातपूर-अंबड लिंक रोड येथे एका 63 वर्षीय महिलेस करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच, मालेगावमधील अ‍ॅन्जियोप्लॉस्टीसाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल केलेल्या एका 64 वर्षीय व्यक्तीला देखील करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

14:50 (IST)16 Apr 2020
तामिळनाडूत बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी तोबा गर्दी

करोनाची लागण होऊ नये यासाठी लोकांना घऱात थांबण्याचं आवाहन केलं जात असताना तामिळनाडूत एका बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येने लोक एकत्र जमल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडू पोलिसांनी याप्रकरणी तीन हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मदुराईमध्ये हा प्रकार घडला आहे. (सविस्तर बातमी)

14:43 (IST)16 Apr 2020
लॉकडाउन हे भारताने वापरलेलं सर्वात प्रभावी अस्त्र – डॉ. रमण गंगाखेडकर

लॉकडाउन हे भारताने वापरलेलं सर्वात प्रभावी अस्त्र असल्याचं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना डॉ. रमण गंगाखेडकर यांनी करोना विषाणूवर औषध, लस शोधण्यासाठी वेळ लागणार असून त्य यश मिळेल. पण भारताने लॉकडाउन सर्वात प्रभावी अस्त्र वापरलं असल्याचं सांगितलं आहे. सर्वांनी सध्या सोशल डिस्टन्सिंग पाळणं, घरीच राहणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले आहेत. करोनाच्या विषाणूला वाढू दिलं नाही तर नव्याने लागण होण्याची संख्या कमी होईल, त्यासाठी लॉकडाऊन काटेकोर पाळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले आहेत. (सविस्तर वृत्त)

14:29 (IST)16 Apr 2020
पिंपरी-चिंचवड शहरात गर्भवती महिला आणि ४ वर्षीय चिमुकलीसह चार जण करोनाबाधित

पिंपरी-चिंचवड शहरात एकुण चार जणांना करोना विषाणूची बाधा झाली असून यात ४ वर्षीय चिमुकली आणि गर्भवती महिलेला करोना झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शहरातील एकुण करोना बाधितांची संख्या ४५ झाली असून इतर तीन जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

14:25 (IST)16 Apr 2020
कौतुकास्पद! सफाई कामगाराने दोन महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला

हातावर पोट असणाऱ्यांना सेवाभावी संस्था तसेच राज्य सरकारांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. अनेक कंपन्या तसेच सेवाभावी संस्थांनी पुढे येत आपल्या पद्धतीने समाजातील गरजूंना मदत करताना दिसत आहे. कोणी अन्नदान करत आहे तर कोणी सहाय्यता निधीसाठी पैसे देत आहे. मात्र तेलंगणामध्ये एका चक्क एका गरीब सफाई कर्मचाऱ्याने आपला दोन महिन्याचा पगार मदत निधी म्हणून दिला आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

14:22 (IST)16 Apr 2020
करोनाशी लढाई सुरु आहे, आजच विजयाची घोषणा नको-राहुल गांधी

आपला देश करोनाशी लढाई लढतो आहे, आत्ताच आपल्या देशाला विजयी घोषित ठरणं गैर ठरेल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की इतर देशांशी तुलना मला करायची नाही. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताने योग्य आणि कठोर पावलं उचलून करोनाशी लढा दिला आहे. याबाबत जेव्हा राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी "मला इतर देशांमध्ये काय सुरु आहे त्यावर भाष्य करायचं नाही. एवढंच सांगायचं आहे की आत्ता आपण विजय झाल्याच्या मानसिकतेत जाणं चुकीचं ठरेल"

14:09 (IST)16 Apr 2020
विविध आजार असलेल्यांसाठी वेगळी रणनिती आवश्यक - राहुल गांधी

डायबिटीस, हायपरटेंशन आणि ह्दयविकार असलेल्या लोकांसाठी वेगळी रणनिती असली पाहिजे. युरोपमध्ये वृद्धांमध्ये हे आजार दिसून येतात. पण भारतात मध्यम वयोगटांमध्येही हे आजार दिसून येतात. त्यामुळे अशा लोकांची काळजी घेतली पाहिजे.

14:08 (IST)16 Apr 2020
विरोधी पक्षात असलो तरी माझा सरकारला पाठिंबा आहे - राहुल गांधी

लोक घरामध्ये बंद आहेत. बेरोजगारीचे संकट आहे. पण तुम्ही चिंता करु नका, भारत कुठल्याही आजारापेक्षा मोठा देश आहे. भारत या व्हायरसला पराभूत करु शकतो. पण आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपण एकत्र झालो तर व्हायरसला हरवू शकतो. आपण यावर मात केली तर आपण खूप पुढे निघून जाऊ. आपण यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे. विरोधी पक्षात असलो तरी माझा सरकारला पाठिंबा आहे. आम्ही सरकारला सकारात्मक सल्ले देणार.

14:02 (IST)16 Apr 2020
आपण आपसात लढाई सुरु केली तर कमकुवत पडणार - राहुल गांधी

टेस्टिंगमुळे कोणाचे नुकसान होणार नाही. त्यामुळे मोठया प्रमाणावर टेस्टिंग करणे आवश्यक आहे. करोनाशी लढायचे असेल तर देशाला एकत्र झाले पाहिजे. आपण आपसात लढाई सुरु केली तर आपण करोना विरुद्धच्या लढाईत कमकुवत पडणार.

14:01 (IST)16 Apr 2020
करोनाला हरवण्यासाठी लॉकडाउन पुरेसं नाही - राहुल गांधी

गेल्या काही दिवसांपासून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलत आहे. देश परदेशातील तज्ज्ञांची माझा संपर्क झाला आहे. मी जे काही बोलत आहे ते त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर अवलंबून आहे. जोपर्यंत लॉकडाउन आहे तोवर करोनाचा व्हायरस थांबेल. परंतु जेव्हा पुन्हा लॉकडाउन संपेल तेव्हा हा करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागेल. लॉकडाउन हा केवळ हा पॉझ बटनाप्रमाणे आहे. करोनाला हरवण्यासाठी केवळ लॉकडाउन पुरेसं नाही, असं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आज माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे अनेक मतभेद असतील. पण या मतभेदांची ही वेळ नाही. आपण एकजुटीनंच याचा सामना केला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.

13:53 (IST)16 Apr 2020
आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही - राहुल गांधी

नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. देशाला एकत्र करुन करोना व्हायरसविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर करोना व्हायरसचा पराभूत करु शकतो आणि भारत खूप पुढे निघून जाईल.

13:51 (IST)16 Apr 2020
करोना व्हायरसला पराभूत करु त्या दिवशी मोदींच्या चूका सांगेन - राहुल गांधी

आपल्याला गोदामामध्ये अन्न-धान्यांचा मोठया प्रमाणावर साठा आहे. डाळी, साखर, तांदूळ, गहू हे दर आठवडयाला गरीबांपर्यंत पोहोचवले पाहिजे. करोना व्हायरसला पराभूत करु त्या दिवशी मोदींच्या चूका सांगेन.

13:39 (IST)16 Apr 2020
करोना विरुद्ध आता लढाई सुरु झाली आहे - राहुल गांधी

करोना विरुद्ध आता लढाई सुरु झाली आहे. आताच विजय मिळवला हे जाहीर करणे चुकीचे ठरेल. आपल्याला दीर्घकाळ लढाई लढावी लागणार आहे.

13:39 (IST)16 Apr 2020
धारावीत पुन्हा आढळले ११ करोनाग्रस्त

मुंबईत दाट लोकवस्ती असलेल्या धारावीतील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गुरुवारी आणखी भर पडली. ११ जणांना करोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे धारावीतील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

13:38 (IST)16 Apr 2020
बेरोजगारीचं संकट गडद होणार, मोठ्या पॅकेजची गरज-राहुल गांधी

करोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यानंतर आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झगडणाऱ्या आपल्या देशाला याच बेरोजगारीच्या आणखी मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्राने पॅकेज जाहीर करावं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. सध्या सरकारने काय केलं नाही काय करायला हवं होतं या सगळ्या चर्चांची वेळ नाही. सध्या एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करायला हवा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्या आर्थव्यवस्थेवर प्रचंड तणाव येणार आहे. मात्र या संकटाचा सामना करावाच लागणार. सध्याच्या घडीला माणसाचं आयुष्य वाचणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. मात्र त्याचवेळी व्हायरस आपली अर्थव्यवस्था नष्ट करणार नाही याचीही काळजी आत्तापासून सरकारने घ्यायला हवी असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

13:37 (IST)16 Apr 2020
करोनाचा विषाणू नियंत्रित होत नाही - राहुल गांधी

करोनाचा विषाणू नियंत्रित होत नाही, त्याचे व्यवस्थापन करावे लागते. लॉकडाउन ठेवायचा की, नाही हे मुख्यमंत्र्यांना ठरवूं दे. तुम्ही एखादा विभाग सुरु केल्यानंतर चाचण्या पुरेशा प्रमाणात झाल्या नसतील तर व्हायरसच्या फैलावामुळे पुन्हा लॉकडाउन करावे लागेल.

13:31 (IST)16 Apr 2020
आर्थिक व्यवस्थापनाची आवश्यकता - राहुल गांधी

रणनिती आखून उद्योग-व्यवसायाचे विभाग सुरु करा, हॉटस्पॉटसमध्ये करोना रुग्णांची ओळख पटवण्यासाठी चाचण्यांचा स्पीड वाढवा. बेरोजगारी वाढणार, आर्थिक भार वाढणार त्यामुळे आर्थिक व्यवस्थापन करण्याची आवश्यकता. राज्यांना काही अधिकार देण्याची आवश्यकता आहे.

13:26 (IST)16 Apr 2020
छोटया मध्यम उद्योगांना पॅकेज द्या - राहुल गांधी

ज्या स्पीडने पैसा पोहोचला पाहिजे त्या स्पीडने पैसा पोहोचत नाहीय. गरीबांना अन्नवाटप सुरु करा, गरीबांच्या खात्यात पैसा जमा करा, बरोजगारी येणार आहे. छोटया मध्यम उद्योगांच्या सुरक्षेसाठी पॅकेज तयार करा.

13:18 (IST)16 Apr 2020
चाचण्या हा एकमेव नियंत्रण मिळवण्याचा मार्ग - राहुल गांधी

रणनिती आखून करोनाच्या चाचण्या करा, जास्तीत जास्त चाचण्या करा, चाचण्यांची संख्या वाढवा, सध्या चाचण्यांचे प्रमाण खूप कमी आहे आणि सध्या रणनितीनुसार चाचण्या सुरु नाहीत.

13:17 (IST)16 Apr 2020
लॉकाडाउन हे करोना व्हायरसवर औषध नाही - राहुल गांधी

लॉकाडाउन हे करोना व्हायरसवर औषध नाही, लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा व्हायरस डोकं वर काढणार, लॉकडाउन फक्त काही वेळासाठी व्हायरसला रोखतो, चाचणी हा एकमेव मार्ग आहे त्यातून आपल्याला व्हायरस कुठल्या दिशेला चालला आहे हे समजते.

13:14 (IST)16 Apr 2020
सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम करण्याची गरज - राहुल गांधी

करोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि लोकांनी एकत्र काम केले पाहिजे तरच या संकटावर मात करणं शक्य आहे.

12:54 (IST)16 Apr 2020
धक्कादायक! सोलापूरात एकाच दिवशी १० करोनाबाधित आढळले; नर्समुळे ९ जणांना लागण

सोलापुरात आज (गुरुवार) एकाच दिवशी करोनाचे दहा रूग्ण आढळले आहेत. ४२ संशयित रूग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असता त्यात दहा जणांना करोना संसर्ग झाल्याचे दिसून आले. तर अन्य ३२ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

12:26 (IST)16 Apr 2020
महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा झाला ३०८१

महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गुरुवारी आणखी वाढ झाली. त्यामुळे राज्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची तीन हजार ८१ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत.

12:10 (IST)16 Apr 2020
पंतप्रधान मोदींनी निर्मला सीतारमन यांची भेट घेतली

देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची भेट घेतली. शेती, उद्योग, व्यवसाय सर्वच ठप्प असल्यामुळे अर्थव्यस्थेसाठी आवश्यक असलेल्या पॅकेज संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे

12:03 (IST)16 Apr 2020
गुजरातमध्ये वैज्ञानिकांचा Covid-19 वर महत्वाचा शोध, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

करोना व्हायरसवर जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. या व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? त्यावर कुठली लस, औषध प्रभावी ठरेल? यावर जगभरातील प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. यामध्ये भारतातील जीबीआरसीने Covid-19 संदर्भात महत्वाची माहिती शोधून काढली आहे. वाचा सविस्तर बातमी.

11:36 (IST)16 Apr 2020
पुण्यात ३९ लाखांच्या सिगारेट जप्त

लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा कऱणाऱ्या डीलरविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी धाड टाकत ३९ लाखांच्या सिगारेट जप्त केल्या आहेत. पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सिगारेटचा एक डीलर शहरात सिगारेट तसंच इतर गोष्टी ज्यांचा जीवनाश्यक वस्तूंमध्ये समावेश होत नाही यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. (सविस्तर वृत्त)

11:33 (IST)16 Apr 2020
राहुल गांधींची १ वाजता पत्रकार परिषद

काँग्रेस नेते राहुल गांधी दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

11:32 (IST)16 Apr 2020
Video: पोलिसांनी रस्त्यात ऑटो थांबवली; डिस्चार्ज मिळालेल्या पित्याला तो उचलून घरी घेऊन गेला

केरळमधील कोल्लम जिल्ह्यामधील पुनारुल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पोलिसांनी लॉकडाउनचे कारण देत पोलिसांनी रिक्षा थांबवल्यामुळे एका व्यक्तीला आपल्या वयस्कर वडीलांना एक किलोमीटरचे अंतर उचलून न्यावे लागले. या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुलाने आपल्या वयस्कर वडिलांना उचलून घेतल्याचे दिसत आहे. येथे वाचा नक्की काय आहे हे प्रकरण

11:28 (IST)16 Apr 2020
“आम्हालाही मदत करा”, पाकिस्तानने भारतासमोर पसरले हात

करोनाचा फैलाव संपूर्ण जगभरात झाला असून पाकिस्तानमध्येही थैमान घातला आहे. करोनासोबत लढण्यासाठी इम्रान खान सरकारने आता भारताकडे मदत मागितली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे. याआधी अमेरिका आणि ब्राझीलने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे. (सविस्तर वृत्त)

10:50 (IST)16 Apr 2020
भावा तू फक्त अ‍ॅपचं नाव सांग... भाषा शिकणाऱ्या अ‍ॅपवरुन ओळखीनंतर परदेशी मुलीशी प्रेमविवाह करणाऱ्याला प्रश्न

हरियाणामधील रोहतक येथे राहणाऱ्या निरंजन कश्यप आणि मूळची मॅक्सिकोची असणाऱ्या डॅना यांनी १३ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज केलं. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार या दोघांना करोना लॉकडाउन असतानाही लग्नाची परवाणगी देण्यात आली आहे. निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हे दोघे लग्न बंधनात अडकले.येथे वाचा सविस्तर वृत्त

10:49 (IST)16 Apr 2020
“मोदीजी, राज्यांना नुसतं कौतुक नको करोनाविरुद्ध लढण्यासाठी आर्थिक मदतही द्या”

केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिल रोजी देशाला संबोधित करताना करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी कोणत्याही आर्थिक मदतीची घोषणा न केल्याबद्दल थॉमस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारांना सध्या केवळ कौतुकाची नाही तर मदतीची गजर असल्याचा टोला थॉमस यांनी लगावला आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

10:45 (IST)16 Apr 2020
Covid-19 वर लस एकमेव मार्ग, तरच जग पूर्वपदावर येईल – संयुक्त राष्ट्रप्रमुख

करोना व्हायरसवर लसचं प्रभावी ठरु शकते. ही लस उपलब्ध झाली तर परिस्थिती पुन्हा सामान्य होईल असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस बुधवारी म्हणाले. वर्ष संपण्याआधी ही लस बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर बातमी.

10:13 (IST)16 Apr 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांना करोनाची लागण

माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यामधील नेते आनंद परांजपे यांना करोनाची लागण झाली आहे. आनंद परांजपे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात होते. जितेंद्र आव्हाड यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, मात्र पूर्वकाळजी म्हणून सध्या ते कुटुंबासोत होम क्वारंटाइन आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कातील जवळपास १५ जणांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये पाच पोलीस कर्मचारी, घऱातील कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (सविस्तर वृत्त)

10:12 (IST)16 Apr 2020
“बंदूक चालवू शकत नाही तर पोलिसांना दिली कशाला?”, कंगनाच्या बहिणीचं टीकास्त्र

करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला असून अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडत असून सरकारवर टीका करत आहे. नुकतंच तिने सरकारी यंत्रणेवर टीका करणारं टीक करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हा कसला देश आहे जो डॉक्टरांची सुरक्षा करु शकत नाही असा सवाल रंगोलीने विचारला आहे. तसंच बंदूक चालवू शकत नाही तर पोलिसांना दिली कशाला? असंही तिने विचारलं आहे. (सविस्तर वृत्त)

टॅग : Coronavirus
Next Stories
1 जगभरात करोनामुळे एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू
2 उद्योगधंद्यांना सोमवारपासून मुभा
3 अमेरिकेकडून ‘डब्ल्यूएचओ’चा निधी बंद
Just Now!
X