करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असून सर्वोपतरी प्रयत्न केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेद घेत नागरिकांना घाबरुन जाऊ नका असं आवाहन केलं. घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही असं सांगताना हे वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याचंही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

– करोना हे परदेशी संकट आहे. करोनासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठादेखील आहे. करोना हे एक युद्ध आहे, घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही. हे व्हायरस विरुद्ध युद्ध आहे. तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे.

– सीमेवर जसे जवान लढतात तसंच या विषाणूसोबत डॉक्टर, नर्स, बस ड्रायव्हर, सर्व अधिकारी आपल्यासाठी लढत आहेत. ही लोक आपल्यासाठी २४ तास लढत आहेत. जर ते आपल्यासाठी काम करत असतील तर आपण घरात राहू शकत नाही का?

– ट्रेन, बसची गर्दी ओसरली आहे. पण सांगूनही अनावश्यक प्रवास होत आहे. शक्य असेल तर अजून प्रवास बंद करा.

– आपल्याकडे केसेस वाढत आहे. काळजी घ्यावी लागणार आहे.

– बाहेरच्या देशातून जे लोक येत आहेत ते आपलेच आहेत. कुणाचा मुलगा असेल, काका, मामा असतील त्यांच्यासाठी आपले दरवाजे उघडेच आहेत.

– परदेशातून आल्यानंतर दिलेल्या सूचना पाळा. हातावर शिक्का मारलेले लोक इकडे तिकडे फिरत आहेत. आपली माहिती लपवत आहेत..हे योग्य नाही.

– मी पंतप्रधान यांच्याशी बोललो आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार त्यांनी आश्वासन दिले आहे

– हे युद्ध जिद्दीवर लढले जाते, जी यंत्रणा तुमच्यासाठी काम करत आहे, त्यांच्यावर तुम्ही भार आणू नका, जेवढा त्यांच्यावरचा भार आपण कमी करु, तेवढे त्यांना अधिक काम करता येईल.

– ज्या सूचना सरकारने दिल्या आहेत त्या पाळा. सर्व धर्मियांना विनंती आहे की, हे संकट जात-पात धर्माच्या पलीकडे आहे. सर्वांनी एकजुटीने लढूया.

– अनवाश्यक गोष्टी आहेत तिथे जाणे टाळा, ऑफिसमध्येही जाऊ नका, वर्क फ्रॉम होम करा. आपण सर्व मिळून या संकटावर मात करु. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आपण हे युद्ध जिंकूच.