सोलापुरात बुधवारी एकाच दिवशी करोनाबाधित १३ नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ६८ वरून ८१ वर पोहोचली आहे. यात सहा मृतांचा समावेश आहे.

बुधवारी आढळून आलेल्या रूग्णांमध्ये अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील ताई चौकात राहणाऱ्या एका आरोग्य महिला कर्मचा-याचा समावेश आहे. याशिवाय लष्कर-सदर बझार येथे तीन महिला तर इंदिरानगर झोपडपट्टीत तीन पुरूषांना करोनाबाधा झाली आहे. शामानगर, मार्कंडेयनगर, शनिवारपेठ, शास्त्रीनगर, आंबेडकर नगर (माऊली चौक) व सिध्दार्थ हाऊसिंग सोसायटी (दक्षिण सदर बझार) येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. यात नऊ महिला आणि चार पुरूषांचा समावेश आहे. यातील बहुतांशी भाग दाट लोकवस्त्यांचा आणि झोपडपट्ट्यांचा आहे.

आतापर्यंत १५ दिवसांत एकूण १६२४ संशयित रूग्णांची करोनाशी संबंधित चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १२५६ रूग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील ११६९ अहवाल नकारात्मक तर ८१ अहवाल सकारात्मक आले आहेत. अद्यापि ३७४ रूग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.

दरम्यान, करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालय तोकडे पडू लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने रेल्वे रूग्णालय व राज्य कामगार विमा रूग्णालय ताब्यात घेऊत तेथे करोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्याची सोय केली आहे.

आतापर्यंत सर्वाधिक २१ रूग्ण एकट्या पाच्छा पेठेतील आहेत. तर ११ रूग्ण शास्त्रीनगरातील आहेत. इंदिरानगर झोपडपट्टी-७, बापूजीनगर-६, लष्कर-५ व हुतात्मा कुर्बानहुसेननगर-३ याप्रमाणे प्रामुख्याने रूग्ण आढळून आलेले भाग आहेत.