दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांमध्ये पालघर जिल्ह्यातील 18 नागरिकांचा समावेश आहे. यातील पाच जणांचा शोध पोलिसांनी घेतला असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

या 18 नागरिकांची माहिती वरिष्ठ कार्यालयातून जिल्हा पोलिस प्रशासनाला मिळाली असून, उर्वरित नागरिकांना संपर्क करण्याचे काम युद्धपातळीवर पोलिसांमार्फत सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन तबलीग ए जमात (मरकज) येथे जिल्ह्यातील 18 जण गेले होते. येथे गेलेल्या नागरिकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातील विविध ठिकाणी या नागरिकांचा शोध शासनाकडून घेतला जात आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागातील यादी तयार करण्यात आली व संबंधित जिल्ह्यांना ही माहिती पाठवण्यात आली होती. त्यानुसार ही यादी पालघर जिल्ह्यालाही प्राप्त झाली ज्यामध्ये 18 जणांचा समावेश आहे.

यापैकी पाच जणांचा संपर्क पोलिसांना झाला असून यातील दोघांना विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर तिघे अलगिकरणाअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय निगराणीखाली आहेत.