मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात आणखी दोन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील करोनाबाधितांचा एकुण आकडा आता 20 वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या एकाचा व रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेल्या एकाचा समावेश असल्याचे सिव्हिल  सर्जन डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

औरंगाबादमध्ये  शुक्रवारी ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५७ जणांना दाखल करून घेण्यात आले. त्यांचे लाळेचे नमुने आज घेण्यात आले तर १३ जणांनी घरातच स्वत:च्या कुटुंबीयांपासून विलगीकरण करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी टाळेबंदीची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे. त्यामुळे रस्ते सुनसान होते. तसेच करोनाच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन दुप्पट करावे, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये मरकजला जाऊन हरियाणा व सोनपेठ मार्गे परतलेल्या २८७ जणांपैकी २८५ जणांचा प्रशासनाने शोध घेतला असून त्यांचे विलगीकरण व तपासण्या केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. या शिवाय ७२ व्यक्ती दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानसह विविध प्रांतातील आहेत.