महाराष्ट्रात बुधवारी ९२११ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या ४ लाख ६५१ इतकी झाली आहे. आतापर्यंत २ लाख ३९ हजार ७५५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४६ हजार १२९ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ हजार ४६३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हिरी रेट ५९.८४ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ७४७८ जणांना आज डिस्चार्च देण्यात आला. आतापर्यंत २० लाख १६ हजार २३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधील ४ लाख ६५१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सध्या ८ लाख ८८ हजार ६२३ रुग्ण होम क्वारंटाइन असून ४० हजार ७७ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

याआधी मंगळवारी महाराष्ट्रात १० हजार ३३३ रुग्णांना २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला होता. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त होती. मंगळवारी ७ हजार ७१७ जणांना करोनाची बाधा झाली होती तर २८२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान मुंबईमधील करोना चाचण्यांची संख्या एकीकडे आम्ही वाढवत आहोत तर दुसरीकडे पालिका रुग्णालयात वेळेत रुग्ण दाखल करून प्रभावी उपचार देत असल्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे. तसंच मृत्यूचं प्रमाण आणखी कमी करण्याचा प्रयत्न असून एकूण ८४,५७० रुग्ण आजपर्यंत बरे झाल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं आहे.