राज्यातील करोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावला असला, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय रूग्णांचे मृत्यू देखील सुरूच आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ३१ हजार ९६४ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २० हजार २९५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तरे ४४३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५३,३९,८३८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.४६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४६,०८,९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,१३,२१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, सध्या राज्यात २०,५३,३२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १४,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,७६,५७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

“कोविडचा रूग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे ; रोगापेक्षा इलाज भयंकर, असं व्हायला नको”

“कोविडचा रूग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे. त्याच्यापासून त्याचं कुटंबं वाचवलं पाहिजे, त्याला तर वाचवलंच पाहिजे पण त्याचा कुटुंबीयांना संसर्ग झाला नाही पाहिजे. अनावश्यक औषधांचा अतिरेकी वापर ही एक मोठी डोकेदुखी होते म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर या गोष्टी होता कामानये.” असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अधिक खबरदारी घेणं गरजेचं असल्याचंही सांगितलं.