जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. आज औरंगाबादेत आणखी 38  नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून शहारातील कोरनाबाधितांची संख्या आता 546 वर पोहचली आहे.

अगोदरच रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबाद शहरात मागील तीन दिवसांत 168 नवे रुग्ण आढळून आल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी शहरात एकदम 100 नवे रुग्ण आढळले होते. तर, आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील रामनगर, दत्तनगर, चंपा चौक, रोहीदास नगर, संजय नगर, सिल्कमिल्क कॉलनी, वसुंधरा कॉलनी सिडको, एमआयटी कॉलेज बीडबायपास  येथील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी व घाटी रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली आहे.