जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांनी 600 चा टप्पा ओलांडला आहे. आज औरंगाबादे जिल्ह्यात आणखी 61  नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 619 वर पोहचली आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा व डॉ. अरविंद गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

आज शहरातील रामगनर, किलेअर्क, एसआरीपएफचा एक जवान, सदानंनगर, न्यायनगर, दत्त नगर,कैलासनगर, भवानी नगर, जुना मोंढा, संजय नगर, एन-4,पुंडलिकनगर,बायजीपुरा, सातारा गाव, बीडबायपास, कोतवालपुरा या भागांमध्ये करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

अगोदरच रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढली आहे व अद्यापही वाढत आहे. चार दिवसांत 241 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. प्रशासनाकडून करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहे.