वसंत मुंडे, बीड
बीड जिल्ह्यात करोनाबाधित ६५ रुग्णांपैकी ४४ रुग्ण बरे झाल्याने करोना महामारीची भीती कमी होत असतानाच एका वृद्धाने आत्महत्या केल्याचे घटना गुरुवारी (ता. चार) पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे घडली. आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) असं मृत व्यक्तीचं नाव असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. चिठ्ठीत त्यांनी करोनाच्या भीतीने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.

बीड जिल्ह्यात सरकारी रूण्णालयात दाखल झालेल्या एकूण ६५ पैकी ४४ रूण्नांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमधील भीतीही काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनानेही व्यवहार सुरू होण्याच्या दृष्टीने लॉकडाउनमध्ये शिथीलता दिली आहे. असं असतानाच पाटोदा तालुक्यातील मौजे मंगेवाडी येथील आसाराम पोटे (६५वर्ष) यांनी करोनाच्या भितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री सातच्या सुमारास उघडकीस आली.

मृत आसाराम पोटे यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. त्यांनी गेल्या काही दिवसात कुठे प्रवासही केलेला नव्हता. नवीन व्यक्तीच्याही संपर्कात आले नव्हते. केवळ करोनाविषयी सुरु असलेली चर्चा ऐकून व सद्य परिस्थिती पाहून त्यांनी शेतात एका झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली असल्याचं नातेवाईक सांगत आहेत. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब समोर आली. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे, यामध्ये कोणाचाही दोष नाही’ असे त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक कृष्णा डोके करत आहेत.

करोना आजाराला न घाबरता केवळ स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. जरी एखादया व्यक्तीला आजार झाला तरी तो व्यक्ती ठणठणीत बरा होऊ शकतो हे मागील काही दिवसापूर्वी बरे झालेल्या रुग्णांवरून स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत ही घटना धक्कादायक आहे. मयत व्यक्ती व कुटुंबात करोनाबाबत काही संबंध नाही. गावातही एकही व्यक्तीला बाधा नाही अशी माहिती पाटोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे यांनी दिली आहे.