राज्य सरकारने काल ११ जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमधील करोनाचे निर्बंध शिथिल केल. त्यानंतर, आज दुसऱ्या दिवशी राज्यभरात आढळलेली करोनाबाधितांची संख्या व करोनामधून बरे झालेल्यांच्या संख्येत फार कमी फरक दिसून आला. राज्यात दिवसभरात ६ हजार ७९९ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ६ हजार ५ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, १७७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली. राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे. दरम्यान, काल दिवसभरात राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रूग्ण करोनातून बरे झाले होते.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१०,१२४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,२१,०६८  झाली आहे.  राज्यात आजपर्यंत १३३२१५ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८५,३२,५२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२१,०६८ (१३.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ७४ हजार ३१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशातील १८ जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढतायत, महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

देशातील काही राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेनंतर या प्रकरणातील तेजीमुळे केंद्र आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशभरात असे १८ जिल्हे आहेत, जिथे करोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. यापैकी १० जिल्हे केवळ केरळमधील आहेत. तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.