करोनाचा संसर्ग कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने पसरू लागला आहे. काल एकाच दिवशी ६ रुग्ण आढळले तर आज पुन्हा ८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई परिसरातून येत असलेल्या रुग्णांना करोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने कोल्हापूरकर भीतीच्या वातावरणात आहेत.

गेल्या आठवड्यात कोल्हापुरात करोनाबाधित रुग्णाची संख्या मर्यादित असल्याने कोल्हापूर जिल्हा सुरक्षित मानला जात होता . गेल्या ४ दिवसात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना करोना झाल्याचे रविवारी सकाळी सूत्रांनी सांगितले. कोल्हापूर मधील २३ वर्षांच्या तरुणीला, आजरा मधील ४९ वर्षांच्या पुरुषाला,शाहुवाडीतील २२ वर्षांच्या तरुणाला, भुदरगड मधील ३२ वर्षांच्या तरुणाला करोनाची लागण झाली. हे रुग्ण बुधवारी व शुक्रवारी रुग्णालयात दाखल झाले होते. आज या चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सायंकाळी त्यामध्ये आणखी मुंबई परिसरातून आलेल्या चौघांची भर पडली. सायन – मुंबई येथून २७ वर्षीय पुरुष व ८ वर्षाचा मुलगा, पालघर येथून आलेला २६ वर्षाचा तरुण आणि अंबरनाथ येथून आलेला २८ वर्षाचा तरुण या चौघांचे अहवालही पॉझिटिव्ह आले.

युवतीला स्वॅबसाठी २८ तास प्रतिक्षा 

करोनाचे संकट वाढत असताना वैद्यकीय यंत्रणेचा गलथानपणा वाढत असल्याचे चित्र कोल्हापुरात आहे. साताऱ्याहून आलेल्या एका युवतीला ईचलकरंजी येथे आयजीएम रुग्णालयात स्वॅब देण्यासाठी तब्बल २८ तास प्रतिक्षा करावी लागली. एका नगरसेवकाच्या पाठपुरावा केल्यानंतर संबंधीत युवतीचा स्वॅब घेवून तिला संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले. गावभागात राहणारी युवती टाळेबंदीमुळे साताऱ्याजवळ पाहुण्यांकडे अडकली होती.

जिल्ह्यात येण्यापूर्वी परवानगीची गरज

आपल्या नातेवाईक, ग्रामस्थांना करोनाचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी जिल्ह्यात येण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.गेली १ मे पासून जिल्ह्यात ५ हजार गाड्या मुंबई-पुण्यातून आल्या आहेत. वैद्यकीय कारणाने पास घेवून १५ ते २० हजार व्यक्ती आल्या आहेत. या सर्वांची स्वॅब  तपासणी अहवाल येण्यासाठी ४ दिवस लागतात. यापूर्वीच्या व्यक्तींचा अहवाल येईपर्यंत थोडेदिवस थांबावे, असे ते म्हणाले.