राज्यात मागील काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत होती. मात्र आता पुन्हा एकदा दररोजची करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत जास्त दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ९ हजार ४८९ नवीन करोनाबाधित आढळले असून, ८ हजार ३९५ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, अद्यापही राज्यात करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत दररोज भर पडतच आहे. आज राज्यात १५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्याती मृत्यू दर २.०१टक्के एवढा आहे.

तर, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४५,३१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१७,५७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२३,२०,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,८८,८४१ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३२,९४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज(शनिवार) नोंदविली. रात्री आठ वाजेपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतिम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे.