राज्यात सध्या करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या सारख्या प्रमुख शहरांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळत आहेत. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ होत आहे. नागपूरमधील करोना संसर्गाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“काही लोकं गृह विलगीकरणात (होमक्वारंटाईन) असूनही रस्त्यांवर फिरत आहेत, त्यामुळे ते मोठ्याप्रमाणावर करोना पसरवत आहेत. नियम डावलून जे रस्त्यांवर फिरत आहेत, आपला शिक्का मिटवत आहेत, त्यांना थेट उचलून संस्थात्मक विलगीकरण केंद्रात नेलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.” अशी भूमिका फडणवीस यांनी यावेली व्यक्त केली.

यावेळी फडणवीस म्हणाले, “लोकांच्या व्यवस्था जर करायच्या असतील तर त्या व्यवस्था करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी तयार असल्याचे या बैठकीत आम्ही सांगितलं. एक महत्वाचा मुद्दा आम्ही मांडलेला आहे की, रूग्णसंख्या वाढलेली असल्याने रूग्णालयांमध्ये त्यांना जागा अपुरी पडत आहे. म्हणून मागील वर्षी सारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यावेळी ज्या रूग्णलायांनी कोविड रूग्णालय म्हणून विशेष कक्ष सुरू केले होते, ते नंतर अनेकांनी बंद केले. आता कोविड हॉस्पिटल आणि कोविड बेड्स हे पुन्हा वाढवावे लागतील. त्यादृष्टीने देखील आपल्याला लक्ष घालावं लागेल.”

याचबरोबर “कोविड बेड्स ज्यांना आवश्यक आहे, म्हणजे ज्यांमध्ये लक्षणं आहेत व प्रकृती गंभीर आहे त्यांच्या करिता आज बेड्स नाहीत, म्हणून तुम्ही पाहिलं असेल आता मृत्यू संख्येत सर्वाधिक मृत्यू हे नागपूरमधील आहेत. यांच कारणं रूग्णालय उपलब्ध होत नाही, त्यामुळे तत्काळ बेड्स वाढवण्याची आम्ही मागणी केली आहे. ज्या रूग्णलायांचे पूर्वी जेवढे कोविड वॉर्ड होते ते त्यांनी पुन्हा सुरू करावेत आणि ज्यांना आवश्यकता नाही, त्याच्या ऐवजी ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना कसं प्राधान्य देता येईल हे पाहावं.” असं देखील फडणवीस यांनी सांगितलं.

“खासगी रूग्णालयांमध्ये जे ऑडीटर्स बसवले होते, जे बिलांवर नियंत्रण ठेवायचे. ते सर्व आता ३१ मार्चच्या कामांसाठी गेले आहेत. ते ऑडीटर्स पुन्हा त्या ठिकाणी नियुक्त झाले पाहिजेत, जेणेकरून बिलांवर देखील नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. गरीब माणसाला वैद्यकीय महाविद्यालय आणि आयजीएमसी या शिवाय दुसरी जागा नाही आणि तिथले बेड्स संपलेले आहेत.” असं देखील फडणवीस यांनी बोलून दाखवलं.