राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. दरम्यान, आज(रविवार) अमरावती व अचलपुरमध्ये पुढील आठवडाभरासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी आज पत्रकारपरिषदेत यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्वांची उपस्थिती होती. उद्या(सोमवार) रात्री ८ वाजेपासून हा लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

“अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगर पालिका , आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी. तसेच नागरिकांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश आज घेतलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.” अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली.

तसेच, “उद्या संध्याकाळपासून जीवानवश्यक वस्तू सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी पुढील आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. जर लोकांनी ऐकलं नाही तर त्यानंतर पूर्णपणे लॉकडाउन करण्याची वेळ आमच्यावर येईल.” असा इशारा देखील यशोमती ठाकुर यांनी दिला आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील करोना प्रतिबंधासाठी कडक निर्बंध

करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने दुकानांच्या वेळा सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार असून, विवाह समारंभाकरिता २५ व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. सदरचे निर्बंध हे १ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत राहणार आहेत. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणवर दिसून येत आहे.