करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोना रुग्ण संख्येत मागील काही दिवसांत झपाट्याने वाढ झाली असताना आज, शहरात 17 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी शहारतील करोनाबाधितांची एकूण संख्या 373 वर पोहचली आहे.

अगोदरच औरंगाबाद शहराचा रेड झोनमध्ये समावेश आहे. त्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.आज आढळलेले रुग्ण हे  जय भीमनगर, पुंडलीकनगर, रेल्वेस्टेशन, किलेअर्क, हमालवाडी, कटकट गेट या परिसरातील आहेत. यामध्ये दहा पुरूष व सात महिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 35 हजार 902 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 15 हजार 266 जण व एक स्थलांतरितासह आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 783 जणांचा समावेश आहे.