चंद्रपूर शहरात शहरात आज दुसरा करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. बिनबा गेट परिसरात  एक करोनाबाधित मुलगी आढळली असून कृष्ण नगर पाठोपाठ हा परिसरही सील करण्यात आलेला आहे. तसेच रेड झोनमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे  संस्थात्मक विलगीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. तर, शहरात उद्यापासून १७ मे पर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

 महानगर प्रशासनाने ९ मे रोजी यवतमाळ येथून आलेल्या २३ वर्षीय मुलीला होम क्वारंटाइन केले होते. ११ मे रोजी या मुलीच्या घशाचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. आज  त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे यापुढे रेडझोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
करोनाला सहज न घेण्याचे आवाहन वडेट्टीवार व जिल्हाधिकारी डॉ.खेमनार यांनी जिल्हावासीयांना केले आहे. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह वैद्यकीय व महसूल विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी १३ मे रोजी रात्री १२ वाजेपासून १७ मे रोजी पर्यंत संपूर्ण चंद्रपूर शहरात ४ मे पूर्वी असणारी टाळेबंदी कायम राहील, असे स्पष्ट केले. त्यामुळे १४ मे पासून शहरांमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते २ खुली राहणार आहेत. नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची सूची तयार होणे, त्यानंतर या परिसरातील संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणी करणे, परिसराची संपूर्ण नाकाबंदी करणे, आरोग्य पथक प्रत्येक घराच्या तपासणीसाठी गठित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पोलीस विभागाने तात्काळ या परिसरात नाकाबंदी करावी असे निर्देशही त्यांनी दुपारी दिले.
रुग्णाच्या संपर्कातील ६२ पैकी ६० नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तर दोन नागरिकांचे  अद्याप रिपोर्ट अप्राप्त आहे. आतापर्यंत २९३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी दोन पॉझिटिव्ह, २३७ नागरिक निगेटिव्तह तर ५४ नागरीकांचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहेत. सध्या २९१ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.