ग्रामविकास विभागामार्फत संपूर्ण राज्यातील जनतेच्या प्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी आठवडाभरात ‘अर्सेनिक अल्बम ३०’ हे औषध राज्यभर मोफत  पुरवले जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, करोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी हे होमिओपॅथी औषध मानवी शरीरात प्रतिकाशक्ती निर्माण करते आणि वाढविते, असे निदर्शनास आले आहे. सरकारच्यावतीने या औषधाच्या वाटपासाठी केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती, त्याला मंजुरीही मिळाली आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार या औषधांचे वाटप केले जाणार आहे.

सध्या राज्यात ग्रामविकास विभागाच्यावतीने जिल्हानिहाय ग्रामपंचायती, कुटुंबांची व नागरिकांची आकडेवारी संकलित करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. पुढील आठवड्यात प्रत्येक गावागावात व प्रत्येक माणसापर्यंत औषध पोहोचवले जाईल, असेही ते म्हणाले.

करोनावर अद्याप कोणतेही औषध सापडलेले नाही. मात्र श्वसनसंस्थेवरील आजारांसाठी होमिओपॅथीमध्ये आधीच असलेल्या ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधाचे चांगले परिणाम दिसत असल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.