23 September 2020

News Flash

“तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा”, देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे

करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभुमीवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणून दिले आहेत. पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी रेशन धान्य, मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि तबलिगी मरकजमधून परतलेल्या नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्ही स्वत: लक्ष घालावं अशी विनंतीही केली आहे. महत्त्वाचं म्हणजे पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा असल्याचंही म्हटलं आहे.

पत्रात काय लिहिलं आहे –

संपूर्ण देशात तसंच राज्यात आपण सारे करोनाविरोधातील लढा लढतोय. हा लढा येणाऱ्या काळात अधिकाधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे अधिक नियोजनातून आपल्याला मार्गक्रमण करावं लागणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने त्वरित निर्णय घेण्यासाठी काही बाबी या पत्रातून आपल्या निदर्शनास आणतो आहे.

१) राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. दररोज मी राज्यातील विविध घटकांशी संवाद साधत असून त्यातून प्रामुख्याने तक्रारी रेशन धान्यासंदर्भात आहे. वस्तुत: केंद्र सरकारने तीन महिन्यांचे धान्य रेशनमार्फत देण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आणि त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना तरीसुद्धा वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. त्यामुळे यात आपण स्वत: लक्ष घालावे अशी माझी नम्र विनंती आहे. सुमारे १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना सुद्धा धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त लागणारे धान्य केंद्र सरकार अत्यल्प दरात उपलब्ध करुन देत असले तरी वाटपातील साठा शिल्लक राहत असल्यने त्याची गरज पडणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोटा उपलब्ध दिल्याप्रमाणे प्रत्येकाला तीन महिन्यांचे धान्य त्वरित उपलब्ध करुन द्यावे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना आधारकार्ड प्रमाण मानून धान्य उपलब्ध करुन द्यावे. तसंच ज्यांच्याकडे दोन्ही नाही अशी यादी प्रमाणित करुन त्यांनाही धान्य सहज उपलब्ध करुन देता येईल. ही कार्यवाही आपण स्वत: लक्ष घालून कराल ही नम्र विनंती आहे.

२) मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच लॉकडाउनच्या काळातील परिस्थिती याचेही गांभीर्याने चिंतन होणं गरजेचं आहे. रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरक्षा उपययोजनांची कमतरता याबाबी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. यावर त्वरित उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. मात्र अद्यापही याबाबतचे उचित प्रोटोकॉल्स कार्यान्वित न झाल्याने अग्रीम पंक्तीतीतल आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्सदेखील रोगाने ग्रसित होताना दिसत आहेत यावर त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.

३) तबलिगीमधून आलेले अनेक लोक महाराष्ट्रात तसंच इतर राज्यातही गेले आहेत. दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित असलेले नागरिक तसेच त्यांच्या संपर्कात आलेले अन्य संशयित यांच्या संदर्भातही कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई करावी अशी विनंती. आज भारतातील एकूण करोनाग्रस्तांच्या यादीत ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच अत्यंत कडक कारवाई यासंदर्भात अपेक्षित आहे.

आणखी वाचा- करोनाबाधित शहरात लॉकडाऊन वाढवला पाहिजे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्र आणि मुंबईत वाढती संख्या चिंतेची बाब आहे. मी काही मुद्द्यांवर आपणाशी दूरध्वनीद्वारे देखील  चर्चा केली आहे आणि इतर मुद्द्यांसदर्भात मी आपणास सविस्तर पत्र पाठवणार आहे. आपण घेत असलेल्या सर्व निर्णयांना भाजपा म्हणून आमचा पाठिंबा आणि सहकार्य आहेत. पण या महत्त्वाच्या बाबतीच हस्तक्षेप करुन जनहिताच्या दृष्टीने आपण त्वरेने निर्णय घ्याल अशी आशा बाळगतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 3:38 pm

Web Title: coronavirus bjp devendra fadanvis letter to shivsena cm uddhav thackeray sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : संसर्ग टाळणारा निर्जंतुकीकरण बोगदा इचलकरंजीत
2 करोनाबाधित शहरात लॉकडाऊन वाढवला पाहिजे : आरोग्यमंत्री राजेश टोपे
3 Lockdown: १० जिल्हे ओलांडून आलेल्या मजुरांना दिलासा; गावच्या अंगणवाडीत मिळाला आश्रय
Just Now!
X