भारतामधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ३५४ रुग्ण सापडले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२० नवे रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा ८६८ वर पोहचला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधितांची संख्या ४४२१ वर पोहोचली आहे. महाष्ट्रातील आठ रुग्णांचा समोवारी मृत्यू झाला. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण हे देशातील प्रमाणापेक्षा अधिक आहे. मागील काही दिवसांपासूनच महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आकडेवारी अशीच दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ठाकरे यांनी रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये रविवारची आकडेवारी दाखवण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत भारतामध्ये करोनाचे ३५७७ रुग्ण होते त्यापैकी २७४ बरे झाले आहेत. तर ८३ जणांचा मृत्यू झाला होता, असं या आकडेवारीमध्ये दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये रविवारी संध्याकाळी करोनाग्रस्तांची संख्या ७४८ इतकी होती. त्यापैकी ५६ जण बरे झाले असून ४५ जणांचा मृत्यू झाल्याचे या आकडेवारीत दिसत आहे.

हे ट्विट रिट्विट करत निलेश राणे यांनी, “देशाच्या तुलनेत ५० % मृत्यू महाराष्ट्रात तरी पण आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतय,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

एकीकडे अनेक सेलिब्रिटींबरोबर वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारकडून होणाऱ्या कामाचे कौतुक केलेलं असतानाच दुसरीकडे भाजपाचे नेते असणाऱ्या निलेश राणेंनी ठाकरे सरकारच्या कामागिरीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.