करोनाशी लढा देताना आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. दरम्यान दुसरकीडे पोलीस आणि डॉक्टरांचाही पगार कापला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. गरज असेल तर आमदारांचा १०० टक्के पगार कापा असंही ते म्हणाले आहेत.

नितेश राणे यांनी काय म्हटलं आहे –
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्र सरकार पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा पगार का कापत आहे ? हे लोक जीव धोक्यात घालून आपल्यासाठी अतिरिक्त काम करत आहेत. हवं असेल तर आम्हा आमदारांचा १०० टक्के पगार कापा..पण पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार कापू नका. उलट त्यांना अतिरिक्त द्या”.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “ही वेळ त्यांचं खच्चीकरण करण्याची नसून मनोधैर्य वाढवण्याची  आहे. ते आपल्यासाठी जीव धोक्यात घालत आहे. आपण किमान त्यांच्या कुटुंबाची तरी योग्य काळजी घेतली पाहिजे. मला अनेक पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे संदेश येत आहेत. ही वेळ त्यांना त्रास देण्याची नाही”.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये काही स्क्रिनशॉटही शेअर केले आहेत.

रोहित पवार यांचं आवाहन –
वेतनात कपातीमध्ये आरोग्य, पोलीस व कोरोनाशी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांनी काहीही काळजी करु नये. याबाबत अजितदादा स्पष्टीकरण देतीलच असं रोहित पवार यांनी ट्विटमधून सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कुणीही उगाच अफवा पसरवू नये असं आवाहन केलं आहे.