भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऊसतोड कामगारांचा प्रश्न मांडत असून त्यांच्यासाठी तातडीने निर्णय घेतला जावा अशी मागणी सरकारकडे करत आहेत. ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा केली आहे. उद्याच्या उद्या निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस असून अनेक मजूर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. पावसामुळे त्यांच्या अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी त्यांचा प्रश्न मांडत उद्याच निर्णय घेण्याची मागणी केली आहे,

पंकजा मुंडे यांनी ट्विट करत मजूर आणि त्याच्या कुटंबाची व्यथा मांडली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलंय. आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करून त्यांच्या ताटात माती? ते हॉटस्पॉट मध्ये नाहीत न हॉटस्पॉटला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!”.

याआधी पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. ऊसतोड मजुरांचा निर्णय तातडीने घ्या. त्यांचा संयम सुटणार नाही याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी १५ दिवस आहेत. त्यांच्यातला एकहीजण साधा शिंकलाही नाही, मग काय चिंता आहे? त्यांना पाठवण्याचा निर्णय झालेला असताना कोण आहेत झारीतले शुक्राचार्य ? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला होता. आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. मात्र निर्णय करा असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- “राज्य सरकारची विनाकारण होणारी बदनामी टाळा”, अजित पवारांचं पालकमंत्र्यांना पत्र

जे ठणठणीत बरे आहेत तेदेखील आजारी पडतील. पाच ते आठ हजार लोक एका ठिकाणी आहे. एक-दोन ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे या सगळ्यांना काय झालं तर कोण जबाबदार? चाचण्या करा, पण यांच्याबद्दलचा निर्णय तातडीने घ्या. ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर आयसोलेटेड राहतील. त्यांची लेकरं, आई-बाप घरी एकटे आहेत हा विचारही करा. असंही पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.