महाराष्ट्रात करोनाचा फैलाव वाढत असून मुंबई, पुणे यांसारख्या शहारानंतर आता सातारा, सांगली येथेही करोनाचे रुग्ण आढळले आहेत. भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे असं सांगताना उदयनराजे यांनी प्रशासनाला पूर्णपणे मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

उदयनराजे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सातारा, सांगली येथे कोरोना रुग्ण सापडले असले तरी लोकांनी घाबरून, गडबडून जाऊ नये. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. आपले प्रशासन निपटारा करण्यासाठी मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे”.

पुढील ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आपण सर्वांनी भारत सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो. काहीही झाले तरी आपण आपल्या घराच्या बाहेर पडू नका. घरातील सदस्याला ताप, डोके दुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी त्रास होत असेल तर आपल्या नजीकच्या डॉक्टरशी संपर्क साधा”.

आणखी वाचा- करोनाचा साताऱ्यात प्रवेश; दुबईहून परतलेल्या महिलेला संसर्ग

दरम्यान महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची १०१ वर पोहचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात १ रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ९७ वरुन १०१ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात करोनामुळे आज चौथ्या मृत्यूची नोंद झाली. कस्तुरबा रुग्णालयात २३ मार्चला दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत होता. ही व्यक्ती युएईतून प्रवास करुन भारतात आली होती. या व्यक्तीस उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहही होता अशीही माहिती मुंबई महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

साताऱ्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला
रविवारी दुबईहून आलेली महिला व कॅलिफोर्नियाहून आलेल्या पुरुष करोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे. विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. तर कॅलिफोर्नियाहून आलेल्या पुरुषाला विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या दोघांचा अहवाल एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून काल रात्री प्राप्त झाला असून ही महिला व पुरुष करोनाबाधित असल्याचे कळवले आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.