पालघर तालुक्यातील  करोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन मुलींचा तपासणी अहवाल नकारात्मक असल्याची पुष्टी जिल्हाधिकारी यांनी केल्याने या मुलींच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून या लहान मुलींबद्दल होत असलेल्या विविध चर्चेच्या उधाणाला पूर्णविराम मिळाला आहे.

या करोनाबाधित मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीलाही याची लागण झाल्यामुळे या दाम्पत्याला असलेल्या  मुलींना करोनाची लागण झाली असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत होत्या. त्यांच्या भवितव्याबद्दलही अनेक प्रश्न निर्माण केले जात होते.अशा स्थितीत या दोन्ही मुलींचे तपासणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्या सुरक्षित झाल्या आहेत.

मृत पावलेली ही करोना बाधित व्यक्ती उपचारासाठी परिसरातील अनेक आरोग्य संस्थांमधून फिरत होती. यादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांसोबत तसेच नातेवाईकांसोबत थेट संपर्कात आल्यामुळे त्यांनाही करोनाचा संसर्ग झाली असल्याची भीती व्यक्त होत होती. यातच पितृछत्र हरवलेल्या या दोन्ही मुलींनाही करोनाची लागण झाल्याची दाट शक्यता वडिलांच्या संपर्कात आल्यामुळे वर्तवली जात होती.मुलींसह या सर्वांचे घशांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते.

या मुली ज्या नातेवाईकांकडे राहात होते तेथेही भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र या जुळ्या मुलींचे तपासणी नमुने नकारात्मक आल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे व उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांवर पडदा पडला आहे. आता या दोन्ही मुलींचे तपासणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्या दोन्ही सुखरूप व सुरक्षित आहेत.मात्र त्यांची आई कोरोनाबधित असल्याने त्यांच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्याचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.