करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लोकांचा संपर्क तुटावा म्हणून सरकारनं लॉकडाउनचं पाऊल टाकलं. पण, करोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढतच आहे. या सगळ्या चिंतेत भर घालणाऱ्या वातावरणात काही दिलासादायक आणि उमेद वाढवणाऱ्या घटनाही समोर येत आहे. नागपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. कर्करोग झालेल्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. आधीचं जीवघेणी व्याधी जडलेली असताना करोनाचा संसर्ग झाला. पण, या व्यक्तीनं जगण्याच्या जिद्दीवर करोनालाही मात दिली आहे.

नागपुरात सोमवारी दिवसभरात नऊ जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर पाच जण उपचार घेऊन करोनातून बरे झाले आहेत. विशेष म्हणजे करोनामुक्त झालेल्या या रुग्णांमध्ये एका कॅन्सर असलेल्या व्यक्तीचाही समावेश आहे. शहरात सोमवारी करोनाची लागण झालेल्यांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकला, पाच आणि सात वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे नागपुरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १६० वर पोहोचली आहे.

पॉझिटिव्ह सापडलेल्या काही रुग्णांना आमदार निवासात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आलं होतं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांना करोनाग्रस्तांच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्यात आले आहेत. हे रुग्ण आढळलेल्या मोमीनपुरा आणि डोबीनगर भागातील ३५० जणांना क्वारंटाईन करण्यात आलं असून, त्यांची आरोग्य तपासणी सुरु आहे.

नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पाच जणांनी सोमवारी या आजारावर मात केली. यात एका कॅन्सर रुग्णाचाही समावेश आहे. सोमवारी करोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ५६ झाली आहे.

३ मे रोजी नागपुरात एकही नवा करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नव्हता. जिल्ह्यातील १९३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान, राज्य सरकारनं लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरात कुठलीही सवलत मिळणार नाही. ज्याप्रकारे ३ मेपर्यंत निर्बंध होते, तसेच निर्बंध १७ मेपर्यंत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.