करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सर्वजण मिळून करोनावर मात करूयात. संकट गंभीर आहे. पण हे सरकारही खंबीर आहे. असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. टेहळणी किंवा फेरफटका मारायला घराबाहेर पडू नका, कृपया घरात राहा, सुरक्षित राहा असं आवाहन यावेळी राज्यातील जनतेला केलं. बुधवारी व्हिडिओद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लोकांना सहकार्य करावं असं आवाहन केलं.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचं आणि लालबागच्या राजा मित्रमंडळाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, मास्कची साठेबाजी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी कौतुकास्पद काम केलं आहे. यापुढेही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची आपेक्षा आहे. तसेच लालबागच्या राजा मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, राज्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी असे उपक्रम होणं महत्त्वाचे आहे.

ठाकरे म्हणाले, राज्यावर आलेलं हे संकट मोठ आहे. करोनाचा विषाणू जिथे अद्याप पोहोचलेला नाही तिथे आपल्याला तो पोहोचू द्यायचा नाही. त्यासाठीच सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, यातून शेतकऱ्यांना शेतावर येणं-जाणं आपण बंद केलेलं नाही. शेतमालाची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही.

आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात येत आहे. त्याचबरोबर कर परतावा भरण्यासाठी आणि बिलं भरण्यासाठीच्या ३१ मार्चची अंतिम तारीख वाढवण्यात यावी या राज्य शासनाच्या विनंतीचा केंद्र सरकारने विचार केल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.