ही राजकारण करण्याची वेळ नाहीय. राजकारण आयुष्यभर म्हणजेच पाचवीलाच पुजलेलं आहे. किती काळ राजकारण करणार?, आयुष्यात दुसरं केलं तरी काय? हा जो काही प्रसंग आहे त्यामध्ये मला राजकारण नकोय. पक्षीय राजकारण इथल्या इथलं थांबलं पाहिजे, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारण करणाऱ्यांना आपल्या खास शैलीमध्ये सुनावले आहे. करोनाचे संकट असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न करण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी कोणाचेही नाव न घेता दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यामधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधताना हे भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाउनसंबंधी सर्वांचं मत जाणून घेतलं. याच बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीमध्ये काय झालं याची माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील लॉकडाउनचा कालावधी आणखीन १५ दिवसांनी वाढवण्यात येत असल्याची महत्वाची घोषणा केली. राज्यामध्ये किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना देशभरातील वेगवगेळ्या राज्यांमधील मुख्यमंत्री, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार एकजुटीने काम करत असल्याचे मत मांडले. मात्र याचवेळी त्यांनी पक्षीय राजकारण न करण्याचा सल्ला दिला.

नक्की वाचा >> …तर करोनाच्या संकटावर मात करुन भारत जगातील महासत्ता होईल: उद्धव ठाकरे

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. “या बैठकीमध्ये सर्वात आधी मला बोलण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी आपण महाराष्ट्रातील लॉकडाउन १४ नंतरही सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले, “अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. पुढे बोलताना त्यांनी “पंतप्रधानांबरोबर राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेली आजची तिसरी चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स होती. आज मी एक बघितलं की संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आहेत. पण सगळेजण राजकारण बाजूला ठेऊन आज एकवटले आहेत. सगळेजण मोदीजींच्या सोबत आहेत. मोदीजीही आपल्या सोबत आहेत. सगळी राज्य सरकारं केंद्र सरकारच्या सोबत आहे. केंद्र सरकार राज्य सरकार सोबत आहे. केंद्र आपल्याला काय हवं नको ते विचारतयं. अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. याच्यामध्ये मला कुठेच वितुष्ट नकोय. मी सर्वांनाच सांगतोय की आता ही राजकारण करण्याची वेळ नाहीय. राजकारण आयुष्यभर म्हणजेच पाचवीलाच पुजलेलं आहे. किती काळ राजकारण करणार?, आयुष्यात दुसरं केलं तरी काय? हा जो काही प्रसंग आहे त्यामध्ये मला राजकारण नकोय. पक्षीय राजकारण इथल्या इथलं थांबलं पाहिजे,” अशा शब्दांमध्ये राजकारण करणाऱ्यांना समज दिली.

नक्की वाचा >> “आजपर्यंत कोणी आमचं तोंड बंद करु शकलेलं नाही, ती हिंमत कोणातही नाही; पण…”

“जे चित्र, जे वातावरण मी गेल्या दोन ती वेळेला या पंतप्रधानांबरोबरच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बघतोय. ते वातावरण असचं राहिलं, एकजूट अशीच राहिली. ती केवळ आत्ताच नाही सदासर्वदा राहिली तर आपला देश या करोनाच्या संकटावर मात करेलच. आपल्या महाराष्ट्राबरोबर इतरही राज्य नक्कीच करोनावर मात करतील. पण त्याचबरोबर आपला देश ही जगातील महासत्ता बनू शकेल,” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी देशभरातील राज्य सरकारे आणि केंद्र सरकारचं कौतुक केलं.