करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन ३० जूनपर्यंत सुरु असणार आहे. दरम्यान लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत हा खुलासा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कुठेही गर्दी करू नका, तसंच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि काळजी घ्या असं आवाहन केल्याची माहितीही यावेळी देण्यात आलेली आहे.

रुग्णांची वाढती संख्या आणि परिस्थिती बिघडता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केला जाणार असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गरज लागली तर पुन्हा लॉकडाउन करावा लागेल असं सांगितलं होतं. पण या वक्तव्याचा काही ठिकाणी विपर्यास करत राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर होणार असल्याची अफवा पसरवली होती.

“काही समाजमाध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे. असे गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

“आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ?
आपला करोनाविरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही, तो सुरूच असून सतर्क राहून घाई-गडबड आणि गर्दी न करता आपल्याला सार्वजनिक ठिकाणी वावरावे लागेल. सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

“आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.