पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे रविवारी रात्री नऊ वाजता देशभरातील नागरिकांनी घरातील लाईट बंद करून मेणबत्त्या, दिवे पेटवले. नऊ मिनिटं दिवे पेटते ठेवतं नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर भाजप आमदारानं विरोधकांवर ट्विट करून टीका केली होती. या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यंगात्मक टोला लगावत उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी घरातील विजेवर चालणारे प्रकाश दिवे (बल्ब) बंद करून दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर विरोधकांनी टीकाही केली. देशात आरोग्य सुविधांवर लक्ष देण्याची गरज असताना पंतप्रधानांनी असं आवाहन करणं चुकीचं आहे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. मात्र, त्यानंतरही देशभरातून दीप जलाओ कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी व्हाट्सअपवर व्हायरल झालेला एक फोटो ट्विट केला. या फोटोवरून सावंत यांनी भाजपाला जाग होण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले सचिन सावंत?

“हा हा हा! जंगलात, दऱ्या खोऱ्यात, पर्वत रांगांमध्ये पण दिवे लागले बरं! प्राण्यांना पण दिवे पोहोचविले होते का? अकलेचे दिवे लावणे याला म्हणतात. देशाला मुर्ख बनविण्याचा उद्योग या भाजपाचे लोक करत आहेत. जागे व्हा!,” अशी कोपरखळी लगावत सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

आणखी वाचा- “हा उपग्रह RSS चा असणार नक्कीच”; भाजपा आमदाराला फेक फोटोमुळे नेटकऱ्यांनी केल ट्रोल

अतुल भातखळकराचं ट्विट काय?

“हसणाऱ्यांचे दात घशात घालत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद दिला. करोनाच्या अंधकारात आशेचा दिवा प्रज्वलित केला. करोना संकटाच्या विरोधात देश एकजूट होऊन उभा राहिला. हे पहा अवकाशातून उपग्रहानं टिपलेलं छायाचित्र,”असं सांगत भातखळकर यांनी विरोधकांना सुनावलं होतं. मात्र भातखळकर यांनी जो फोटो ट्विट केला, तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला फेक फोटो होता. तो ५ एप्रिल रोजी अवकाशातून टिपलेला असल्याचा दावा भातखळकर यांनी केला होता.