करोनाचा वाढलेला कहर रोखण्यासाठी एकीकडे शासन व प्रशासन अहोरात्र झटत आहेत. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात बार्शीसारख्या व्यापारीपेठेत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पारधी समाजातील भोळ्याभाबड्या मंडळींनी ‘करोना’देवीची स्थापना केली आहे. या करोनादेवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडे, बोकडांचाही नैवेद्य दिला जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेची दखल घेत पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. बार्शीत सोलापूर रस्त्यावर असलेल्या पारधी वस्तीत करोनादेवी स्थापनेचा आणि त्या माध्यमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी सोमनाथ परशुराम पवार (वय ४२) व ताराबाई भगवंत पवार (वय ५२) या दोघांविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या कलम ५२ खाली गुन्हा नोंदविण्यात आल्याचे बार्शीचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सांगितले.

सध्या संपूर्ण जगभरासह देशात सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून सोलापूर जिल्ह्यात बार्शीसह सर्वच ठिकाणी करोनाचा फैलाव कायम आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह शासन व प्रशासन अहोरात्र झटत आहे. परंतु त्याचवेळी करोना हा देवीचा कोप असल्याचा दावा करीत बार्शीच्या पारधी वस्तीवरील काही मंडळीँनी चक्क करोनादेवीची स्थापना केली आहे. तेथे एका घरासमोर फरशीचा छोटासा ओटा तयार करून तर बाजूलाच दुसऱ्या ठिकाणी देवदेवतांच्या फोटो लावून देऊळ बांधण्यात आले आहे. तर एका महिलेच्या देवघरात लिंबू ठेऊन करोनादेवीची स्थापना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. करोनादेवीला कोंबडे, बोकडांचा नैवेद्य दाखविल्यास करोना होत नाही. तोंडाला मास्क लावण्याची व इतर काळजी घेण्याची गरज पडत नाही. करोनादेवीची ओटी भरल्यास करोना होत नाही अशा अफवा पसरविण्यात येत आहेत, असे तहसीलदार कुंभार यांनी सांगितले.

“गेले अडीच-तीन महिने आम्ही तोंडाला मास्क लावला नाही. वेळोवेळी हात स्वच्छ धुतले नाहीत. गर्दीही टाळली नाही. आम्हाला साधा ताप, सर्दी-खोकलाही झाला नाही. मुंबई-पुण्याकडील नातेवाईकही आले आहेत. त्यांनीही करोनादेवीची सेवा केली आहे. ऐपतीप्रमाणे बोकड-कोंबड्यांचा नैवेद्यही दिला आहे आणि देवीनेही आम्हाला सुखी ठेवले आहे. करोनादेवीचा आशीर्वाद आम्हाला लाभला आहे. म्हणून आम्हीही देवीची आयुष्यभर सेवा करीत राहणार आहोत,” असे करोनादेवीची स्थापना करणाऱ्यांपैकी काही महिलांनी सांगितले. तर दुसरीकडे हा प्रकार अंधश्रद्धेपोटी होत असल्याचा आक्षेप नोंदवत अंनिसचे बार्शी शाखेचे अध्यक्ष विनायक माळी यांनी या प्रश्नावर पारधी समाजासह एकविसाव्या शतकातही अशा गोष्टींवर ठेवणाऱ्या मंडळींचे प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे म्हटले. मानसिक व आर्थिक शोषणाला खतपाणी घालणारे असे प्रकार रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.