News Flash

CoronaVirus : ‘तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांना संकटात टाकू नका’

पत्रकार परिषदेत दिली राज्यातील परिस्थितीची माहिती

राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४९वर पोहोचली. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये आणखी दोघांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला घरातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. मुंबईसह अनेक शहरातील गर्दी ओसरली असून, करोनाला तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्यापूर्वी थांबवण्याचे प्रयत्न सध्या राज्य सरकारकडून केले जात आहेत.

Live Blog
20:27 (IST)19 Mar 2020
साठेबाजी करु नका

जीवनावश्यक वस्तुंची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. तुम्ही वस्तुंचा साठा करुन ठेऊ नका, आधी ज्या प्रमाणात खरेदी करत होता तसेच चालू ठेवा.

20:25 (IST)19 Mar 2020
करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम

करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. त्यासाठी खास टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स आर्थिक विकासासाठी सहकार्य करेल. या संकटामुळे मध्यम आणि गरीब वर्गाचे मोठे नुकसान केले आहे.

20:22 (IST)19 Mar 2020
थाळी, टाळी वाजवून आभार माना

सध्या जे सरकारी कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यांना २२ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळी वाजवून त्यांचे आभार व्यक्त करा.

20:17 (IST)19 Mar 2020
जनता कर्फ्यू पाळा

२२ मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत जनता कर्फ्यूचे पालन करा. ही आपल्या संयमाची परीक्षा असेल. कोणीही घराबाहेर पडू नका. घरातच राहा. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हे सुद्धा समजेल. 

20:12 (IST)19 Mar 2020
तुम्ही गर्दी टाळली पाहिजे

तु्म्हाला असे वाटते की, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही बाहेर फिरत राहणार तर तुमची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांना संकटात टाकत आहात. तुम्ही गर्दी टाळली पाहिजे. आवश्यकता असेल तरच बाहेर पडा.

20:10 (IST)19 Mar 2020
संयम आणि संकल्प दृढ करण्याची गरज

संयम आणि संकल्प दृढ करण्याची गरज विकसित देशांवर करोनाचा प्रभाव आपण पाहतोय. भारतावर याचा प्रभाव पडणार नाही असे मानणे चुकीचे आहे. १३० कोटी देशवासियांना संयम आणि संकल्प अधिक दृढ करण्याची गरज आहे. करोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशाने पालन केले पाहिजे. या साथीच्या आजारात मी स्वस्थ तर जग स्वस्थ हा मंत्र उपयोगाला येतो.

20:06 (IST)19 Mar 2020
मी आज तुमच्याकडे काही मागणार आहे

मी जेव्हा तुमच्याकडे कधी काही मागितले तेव्हा देशवासियांनी नाराज केलेले नाही. मला आज १३० कोटी देशवासियांकडे काही मागायचे आहे. पण तुमचा काही वेळ हवा आहे. आजपर्यंत विज्ञानाला करोनावर उपाय शोधता आलेला नाही. आज जगातील अनेक देशांमध्ये करोनाचा प्रभाव वाढला आहे. सुरुवातीच्या काही दिवसानंतर अचानक करोनाचा स्फोट झाला आहे. भारत सरकार आज या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेऊन आहे.

20:03 (IST)19 Mar 2020
सध्याच्या आपत्तीने संपूर्ण मानवजातीला संकटात टाकले आहे

सध्या संपूर्ण जग संकटाचा सामना करत आहे. नैसर्गिक संकट राज्यांपर्यंत मर्यादीत असते. पण सध्याच्या आपत्तीने संपूर्ण मानवजातीला संकटात टाकले आहे. पहिल्या महायुद्धापेक्षा जग आज करोनामुळे जास्त त्रस्त आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

19:59 (IST)19 Mar 2020
गुजरातमध्ये करोना व्हायरसचे दोन रुग्ण

गुजरातमध्ये करोना व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. एक रुग्ण राजकोटचा तर दुसरा सूरतचा आहे.

19:48 (IST)19 Mar 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोडयाच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार, काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

19:33 (IST)19 Mar 2020
सूरतमध्ये कलम १४४ लागू

केरळच्या कासारगोडमध्ये एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण. भारतात करोना व्हायरसचे एकूण १८५ रुग्ण. गुजरातच्या सूरतमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू. २९ मार्चपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

19:28 (IST)19 Mar 2020
वसईत डॉक्टरांवर कारवाई

वसई शहरात करोनाचे रुग्ण नसले तरी करोनावर औषधे देणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढत आहे. दोन दिवसात तीन डॉक्टरांवर वसईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गु्न्हे दाखल. एक डॉक्टर तर चक्क १०० रुपयात एक डोस अशा पध्दतीने औषध विकत होता

18:59 (IST)19 Mar 2020
राजेश टोपे यांना एप्रिलची चिंता

"सुरुवातीला करोना व्हायरसचे कमी रुग्ण आढळले असले तरी, पुढच्या काही आठवडयात हा आकडा वाढू शकतो. मला एप्रिलची चिंता आहे, जेव्हा करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढलेला असू शकतो" असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

18:56 (IST)19 Mar 2020
चीनमध्ये ८० हजार तर इटलीत २७ हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण

करोना व्हायरसची २ लाखापेक्षा जास्त लोकांना लागण झाली असून आतापर्यंत ८ हजारपेक्षा जास्त नागरीकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ८० हजारपेक्षा जास्त तर इटलीमध्ये २७ हजारपेक्षा जास्त करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

18:39 (IST)19 Mar 2020
रत्नागिरीत रस्त्याने प्रवासी वाहतूक बंद

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून सोमवारपासून रस्त्याने प्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. 

18:24 (IST)19 Mar 2020
दिल्लीत हॉटेल्स बंद राहणार

दिल्लीत हॉटेल्स बंद राहणार करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार आहेत. फक्त होम डिलिव्हरीची सुविधा चालू राहील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्लीत आतापर्यंत १० जणांना करोनाची लागण झाली आहे.

18:19 (IST)19 Mar 2020
इराणमध्ये एका भारतीयाचा मृत्यू

इराणमध्ये एक भारतीयाचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. करोना व्हायरसमुळे एका भारतीयाचा परदेशात मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे.

18:08 (IST)19 Mar 2020
वृद्धांनी आणि लहान मुलांनी घरातच रहावे

६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि १० वर्षाखालील मुलांनी घरातच रहावे, यासंदर्भात राज्य सरकारांनी निर्देश जारी करावेत अशी सूचना भारत सरकारने केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी क्षेत्राने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी असे सरकारने म्हटले आहे.

17:40 (IST)19 Mar 2020
रशियात पहिला मृत्यू

करोना व्हायरसमुळे रशियात पहिला मृत्यू झाला आहे. एका ७९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

17:38 (IST)19 Mar 2020
करोना व्हायरसचा चौथा बळी

भारतात करोना व्हायरसमुळे चौथा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील एका ७० वर्षीय व्यक्तीने करोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. हा रुग्ण इटालीमार्गे जर्मनीहून भारतात आला होता. 

17:33 (IST)19 Mar 2020
आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुढच्या आठवडयाभरासाठी भारतातून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे. २२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. 

16:34 (IST)19 Mar 2020
एकमेकांच्या जवळ जाणं टाळा - राज ठाकरे

आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही असे राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

16:18 (IST)19 Mar 2020
राज ठाकरेंच फेसबुकवरुन आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या फेसबुक पेजवरुन महत्वाचे आवाहन केले आहे. करोनाला रोखण्यासाठी काय केले पाहिजे? काय काळजी घ्यावी? यासंबंधी फेसबुकवरुन महाराष्ट्र सैनिकांना काही सल्ले दिले आहेत.

15:49 (IST)19 Mar 2020
पंजाबमध्ये सार्वजनिक वाहतूक बंद

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंजाब सरकारने सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बस, ऑटो रिक्षा आणि टेम्पो यांच्या वाहतुकीवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

15:00 (IST)19 Mar 2020
आरोग्यमंत्र्यांचं खणखणीत उत्तर; महाराष्ट्र फेज-३ मध्ये जाणार नाही

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र 'फेज-३'मध्ये गेला तर काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी निर्धारानं उत्तर दिलं. 'आपण चांगला विचार करा. महाराष्ट्र फेज-३मध्ये जाणार नाही,' असं टोपे म्हणाले.

14:33 (IST)19 Mar 2020
करोनाबाधित रुग्ण अहमदनगरचा

४८ वा रुग्ण २२ वर्षांची महिला आहे. ४९ वा रुग्ण ५१ वर्षांचा पुरुष आहे. तो अहमदनगरचा आहे त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री असून, तो दुबईतून आला आहे, अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. १२ तासात चार नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्ग होण्याचं प्रमाण ५० मध्ये १० आहेत. संसर्ग होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

14:01 (IST)19 Mar 2020
"महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांचा अभिमान वाटतो"

करोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य मंत्र्यालय आणि डॉक्टर आणि नर्सेसचेची सुळे यांनी कौतुक केलं आहे. ट्विटरवरुन त्यांनी ट्विट करत या संकटाचा समान करणाऱ्या सरकारी यंत्रणेचे कौतुक करतानाच याची लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

13:34 (IST)19 Mar 2020
दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर-आरोग्यमंत्री

राज्यात सध्या एकूण ४९ जण करोनाबाधित आहेत. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. या एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी चाळीस जण परदेशातून आलेले आहेत. तर इतर ९ जण त्यांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग झाला आहे. सध्या एकूण रुग्णांपैकी दोन जण व्हेंटिलेटर असून, इतरांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

13:19 (IST)19 Mar 2020
महाराष्ट्रात ४९ जण करोनाबाधित; आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. फेज २ मधून फेज ३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

13:08 (IST)19 Mar 2020
नागरिकांच्या जीवाशी खेळ

करोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यात नागरिकांकडून आरोग्याची काळजी घेतली जात आहे. नागरिक स्वयंस्फूर्तीनं मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहे. मात्र, याचा अनेक जण फायदा घेत असून, हलक्या दर्जाचे मास्क विकले जात असल्याचं समोर आलं आहे.

12:53 (IST)19 Mar 2020
मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या जनतेला हाक

राज्यातील करोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. 'करोना व्हायरससोबत हे युद्ध आहे. हे युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे सगळ्यांनी जिद्दीनं लढा द्यायला हवा. घाबरून चालणार नाही. सर्वच सरकारी यंत्रणा करोनाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. यात राज्यातील जनतेनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं. सरकार प्रसंगी कठोर निर्णय घेऊ शकते. ती वेळ आणू नका, असं कळळीचं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं.

12:47 (IST)19 Mar 2020
राज्यात आणखी दोघांना संसर्ग; करोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर

राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. या करोनाबाधित रुग्णावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.

12:42 (IST)19 Mar 2020
वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या

राज्य सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या आवाहनाला लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. पण, अजून गर्दी कमी करण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणा करोनाविरोधात सक्षम आहेत. फक्त नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. 'वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य द्यावं. लोकल, बस सेवेतील ताण कमी करावा, जेणेकरून आपल्याला करोनावर मात करता येईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

12:29 (IST)19 Mar 2020
दिलेल्या सूचनाचं पालन करा- उद्धव ठाकरे

'राज्यात करोनाचा शिरकाव परदेशातून आलेल्या नागरिकांमुळेच झाला. ते काही परदेशी नव्हते. ते परदेशात फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग झाला आणि करोना वाढला आहे. सध्या सरकार लागण झालेल्यांना विलगीकरण करत आहेत. काहींना घरीच वेगळं राहण्याचं सांगण्यात आलं आहे. पण, ते हे लपवून सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. त्यामुळे मी विनंती करतो की, नागरिकांनी सरकारकडून दिलेल्या सूचनाचं पालन करा,' असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं.

12:25 (IST)19 Mar 2020
भोंगा वाजला आहे, युद्ध सुरू झालं

करोनाविरोधातील युद्ध सुरू झालं आहे. डॉक्टर, नर्स, बसचे कर्मचारी यांच्यासह सर्वच यंत्रणा आपआपल्यापरीनं लढत आहे. मी राज्यातील जनतेला आवाहन करतो की त्यांनी घरी राहावं. अनावश्यक प्रवास टाळावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

12:22 (IST)19 Mar 2020
हे युद्ध आहे, यात जनतेच सहकार्य हवं -उद्धव ठाकरे

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा सक्षम आहेत. करोनाविरोधातील लढा हे एक युद्ध आहे. ते युद्ध लढण्यासाठी सरकारला जनतेचं सहकार्य हवं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

12:16 (IST)19 Mar 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार राज्याला संबोधित

राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरूवारी राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. राज्यात संसर्ग थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे जनतेच्या लक्ष लागले आहेत.

Next Stories
1 Coronavirus : शहापुरात सापडला लो रिस्क संशयित रुग्ण
2 ‘करोना’ संशयितांची नाव उघड करणारा मनसे उपाध्यक्ष गोत्यात
3 CoronaVirus : प्रेरणादायी गोष्ट; जगभर थैमान घालणारा ‘प्लेग’ कोल्हापुरात टिकू शकला नाही
Just Now!
X