करोनाबाधितांचे रूग्ण औषध व अन्य उपचारासाठी दारोदार फिरत असल्याचे वाढत्या संक्रमणामूळे दिसून येत आहे. योग्य मार्गदर्शन दिल्यास त्यांची वणवण थांबू शकते, हे चित्र मात्र दिसत नाही. लगतच्या वरूड येथील उपसरपंच आशिष ताकसांडे यांना आलेला अनुभव असा संतप्त करणारा आहे. सावंगीच्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या त्यांच्या कुटूंबातील एका रूग्णास इंजेक्शनची गरज पडली. ते मिळविण्यासाठी परिवाराकडून धावाधाव सुरू झाली. लगतच्या चारही जिल्ह्यात त्यांनी विचारपूस केली. शेवटी सावंगीच्याच रूग्णालयाला त्यांनी हातपाय जोडून इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने मिळालेल्या माहितीनूसार जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांनी धाव घेतली. मात्र येथून इंजेक्शन प्राप्त होण्यासाठी सावंगीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. ते घेवून तसेच कर्मचा-यांना सोबत घेवून आप्तमंडळी सामान्य रूग्णालयात पोहोचली.

औषध विभागप्रमुख वाळके यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस यांची शिफारस आणण्यास सांगितली. प्रथम ते सुट्टीवर असल्याचे उत्तर मिळाले. मात्र आप्तमंडळींनी थेट चिकित्सकाच्या दालनात धाव घेतल्यावर त्यांची डॉ. तडससोबत भेट झाली. त्यांनी शिफारस केल्यावर आप्त वाळकेंकडे पोहोचले. त्यांनी परत उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांच्याकडे परवानगी देण्याचे अधिकार असल्याने त्यांना भेटण्यास सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय गाठून पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांनी आपल्याला अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. माझा संबंध नसून तुम्ही थेट जिल्हाधिका-यांना भेटा, असे सुचविले. तोपर्यत नातेवाईक चांगलेच घायकुतीस आले होते.

सकाळी ११ पासून त्यांची पायपीट सुरू होती. दुपारी ४ वाजता ताकसांडे स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. व्यस्त असणा-या पाटील यांची पाच वाजता भेट झाली. खरे काय ते सांगा, चकरा कशाला मारायला लावता, असा जाब विचारण्यात आला. पाटील यांनी मग डॉ. तडस यांना दूरध्वनीवरून खडसावले. तुम्ही जिल्हा चिकित्सक आहात, माझ्याकडे कशाला पाठविता. रूग्णांच्या आप्तांना माझी शिफारस आणायला सांगणारे हे वाळके कोण, असा सवाल त्यांनी तडस यांना केला. पाटील यांनी यावेळी सामान्य रूग्णालयातूनच इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले. सल्ला मिळाल्यानूसार ते जिल्हाधिका-यांकडे गेले. पण भेट मिळाली नाही. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती मोरे यांना भेटून नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने परत जिल्हा चिकित्सकाकडे जाण्यास सांगितले. ही मंडळी परत जिल्हा चिकित्सकाच्या दालणात पोहोचल्यावर याठिकाणी खासदार रामदास तडस उपस्थित असल्याचे दिसले. ताकसांडे यांनी त्यांना विनंती केली. खासदारांनी औषध लगेच उपलब्ध करून देण्याची सुचना केली. परत औषधी विभागप्रमुख वाळकेंकडे सगळे पोहोचले. त्यांनी अर्धातास चालढकल केल्यानंतर औषध उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. इतका आटापिटा करून काहीच साध्य होत नसल्याचे दिसल्यावर धावपळ करणा-यांच्या भावनांचा उद्रेक झाला.

ताकसांडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सोबत घेवून औषधी विभाग गाठला. वाळके व डॉ. तडस यांची त्यांनी जाहीर कान उघाडनी केली. संतापजनक भावना व्यक्त केल्या. सर्वांनी चिकित्सक डॉ. तडस यांना अडवून धरले. औषध द्या, मगच जा, अशी भूमिका घेवून आप्त अडून बसले. या प्रकरणात शेवटी पोलीसांचा हस्तक्षेप अनिवार्य ठरल्यावर पोलीस निरिक्षक ब्राम्हणे यांनी दवाखान्यात धाव घेतली. दिवसभर हेलपाटा घालणा-या रूग्णांच्या आप्तांविषयी पोलीसांनीही सहानुभूती दर्शविली. विनाकारण त्रास दिल्याबद्दल आश्चार्य व्यक्त केले. पोलीसांनी समजूत घातल्यावर रात्री डॉ. तडस यांची अखेर सुटका झाली. हा अत्यंत घृणास्पद व माणुसकीला लज्जास्पद ठरणारा प्रकार असल्याचे ताकसांडे म्हणाले. जिल्हाधिका-यांनी केवळ आदेश काढून चालणार नाही, तर त्यांनी अंमलबजावणीकडे लक्ष देण आवश्यक असल्याचे ताकसांडे म्हणाले. शेवटी कुटूंबांनीच प्रयत्न करून औषध मिळविल्याने रूग्णाला दिलासा मिळाला आहे.