नागपूरमध्ये जरीपटका येथील शनिवारी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या मुलीलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आढळलेला रूग्ण दिल्लीहून परतलेल्या एका करोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आता त्याच्या ११ वर्षांच्या मुलीलाही करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

नागपूरच्या दिल्ली प्रवासाचा इतिहास असलेल्या एका व्यावसायिकाला करोना असल्याचे २६ मार्चला पुढे आले होते. त्यानंतर २७ मार्चला त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, आईसह त्याच्या एका कर्मचाऱ्याला करोना असल्याचे स्पष्ट झाले. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलीसह या व्यावसायिकांच्या संपर्कातील इतर एका नातेवाईकाला २८ मार्चला करोना असल्याचे निदान झाले. या नातेवाईकाच्या ११ वर्षीय मुलीलाही करोनाची बाधा झाल्याचे रविवारी पुढे आले आहे. या सर्व रूग्णांवर आता नागपुरातील मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगावमध्ये आढळला करोनाचा रूग्ण
जळगावमध्येही शनिवारी रात्री करोनाचा रूग्ण आढळला आहे. जळगाव येथील तीन संशयितांचे नमुने शनिवारी पुण्याला पाठण्यात आले होते. त्यापैकी एका व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तीन जणांचे अहवाल आज (ता.२८) सायंकाळी प्राप्त झाले. यातील ४५ वर्षीय व्यक्तीचे नमुने पॉझिटीव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या रूग्णास जिल्हा रूग्णालयातील आयसोलेट कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या व्यक्तीच्या कुटूंबाचीही तपासणी होणार असून तपासणी करून त्यांना आयसोलेट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांनी दिली.