देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ७० टक्के इतकं कर्ज आपला देश काढतो. अमेरिका १०० टक्के काढतो, तर जपान १६० टक्के काढतो. भारतानंही सध्याच्या परिस्थितीत देशाच्या जीडीपीच्या १०० टक्के इतकं कर्ज काढलं पाहिजे आणि करोनामुळे होत असलेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना चव्हाण म्हणाले की, तीन महिन्यांसाठी कर्जावरील व्याजाला स्थगिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे, हा व्याजाचा बोजा केंद्र सरकारनं उचलला पाहिजे. भारताची वित्तीय तूट आपण ३.५ टक्क्यांच्या आसपास ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्या सरकारांनी हा संकेत पाळलेला आहे. मला वाटतं की आता वित्तीय तूट १० टक्क्यांपर्यंत वाढवायला हरकत नाही.

आणखी वाचा- नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं – पृथ्वीराज चव्हाण

जीव वाचवायचा की, अर्थव्यवस्था सांभाळायची असा प्रश्न उभा राहिलेला आहे. जीव वाचवण्यावर दुमत तर नाहीच, पण अर्थव्यवस्थेलाही उभारी देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेलं एक लाख ७० हजार कोटींचं पॅकेज अत्यंत तुटपुंज आहे.. हे काही लाख कोटींचं पॅकेज दिलं पाहिजे. त्यासाठी वित्तीय तूट व जीडीपीच्या तुलनेत १०० टक्के कर्ज हे उपाय अवलंबायला हवेत.

आणखी वाचा- पृथ्वीराज चव्हाण करोना व्हायरसला बायोलॉजिकल टाइमबॉम्ब का म्हणाले?

सरकारने २० लाख कोटीपर्यंत पैसे ओतण्याची तयारी ठेवावी. अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा १७ ते १८ टक्के आहे. शेती, उद्योग, सेवा क्षेत्र पूर्णपणे ठप्प आहे. लघु उद्योजकांच्या कर्जावरील व्याज सरकारने भरावं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.