News Flash

Coronavirus Crisis : केंद्रसरकार जाणूनबुजून अन्याय करतेय की, काम करता येत नाही – नवाब मलिक

करोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असल्याचेही म्हटले आहे.

संग्रहीत छायाचित्र

देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. राज्यात लस तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन देखील अपुरा पडत असल्याने वारंवार केंद्रकडे मागणी केली जात आहे. रेमडेसिवीरचा देखील वेळेत पुरवठा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, “आजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी ४ लाख करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही करोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच, शिवाय हतबलही झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने करोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन, केंद्रसरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मात्र केंद्रसरकार यामध्ये हतबल झाल्याचे दिसून येत आहे. राज्यांना ऑक्सिजन साठा निश्चित केल्यानंतरही दिला जात नसल्याची सत्यपरिस्थिती आहे. दोन दिवसापासून कर्नाटकच्या प्लांटमधून येणारा ५० टँकचा कोटा राज्याला मिळेनासा झाला आहे.”

तसेच, “रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत वितरीत करता येत नाही. लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाही. शिवाय राज्यसरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस नाही.” असं देखील मलिक यांनी सांगितलं आहे.

याचबरोबर “मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे व वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसीवीर वेळेत पुरवठा होत नाही, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. जाणूनबुजून केंद्रसरकार अन्याय करतेय की, केंद्रसरकारला काम करता येत नाही.” असं मलिक यांनी म्हटले आहे. याशिवाय, “लवकरात लवकर लस द्या, ५० टन ऑक्सिजन कोटा पडून आहे. शिवाय रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्या.” अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 9:03 pm

Web Title: coronavirus crisis modi government fails to handle corona situation nawab malik msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “भाजपाने पोटदुखीचा इलाज करावा व भाजपाशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे”
2 “ऑक्सिजनवरील जीएसटी हटवा”; जयंत पाटील यांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी
3 ‘मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जावंच लागेल’; चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला
Just Now!
X