मालेगावात प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार नव्याने १४ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये सकाळी मृत पावलेल्या एका वृध्द डॉक्टरचा तसेच १३ एप्रिल रोजी मृत पावलेल्या महिलेचा समावेश आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७० झाली आहे.
येथील सामान्य रुग्णालयात गुरुवारी सायंकाळी दाखल झालेल्या ८१ वर्षीय डॉक्टरांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल करोनाबााधित असल्याचा आला आहे. तसेच १३ एप्रिल रोजी मृत पावलेल्या महिलेचा प्राप्त झालेला अहवाल देखील सकारात्मक आला असून अन्य १२ जणांचे अहवालही सकारात्मक आले आहेत. या अहवालांमध्ये ११ जण आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत आणि या सर्वांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले आहे. मात्र तीन जण नव्या ठिकाणचे आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 9:58 pm