|| प्रबोध देशपांडे

खासगींमध्ये ओझोन रुग्णालयात सर्वाधिक मृत्यू

अकोला : जिल्ह्यात करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा चांगलाच फुगला असून त्यातील ७५ टक्के करोनाबळी हे शासकीय रुग्णालयात गेले आहेत. २५ टक्के मृत्यू खासगी रुग्णालयात झाले. खासगींमध्ये सर्वाधिक मृत्यू ओझोन रुग्णालयामध्ये झाले आहेत. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांसह मृत्यूची संख्या देखील वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकोला जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून करोना संसर्ग अत्यंत वेगाने पसरत आहे. करोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करून सुद्धा अद्याप त्याचा काहीही उपयोग झाल्याचे दिसून आलेले नाही. जिल्हा प्रशासनाकडून दररोज जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्येही मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. मात्र, प्रशासनाकडून ती आकडेवारी अद्ययावत करण्यात आलेली नाही. पोर्टलवरील ४ एप्रिलपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ३० हजार ६५३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ४९९ रुग्णांचा करोनाने बळी घेतला. २६ हजार २७५ जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत चार शासकीय रुग्णालय व १३ खासगी रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये ३७५ म्हणजेच ७५.२ टक्के रुग्णांचा करोनामुळे प्राण गेला, तर खासगी रुग्णालयांमध्ये १२४ रुग्णांचे मृत्यू झाले. त्याची टक्केवारी २४.८ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण करोना मृत्यूच्या ७४.३ टक्के करोनाबळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले. अकोला जीएमसीला ३७१ रुग्णांना करोनामुळे जीव गमवावा लागला. नागपूर जीएमसीला दोन, आयजीएमसी, यवतमाळ जीएमसी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

खासगी रुग्णालयांचा विचार केल्यास अकोल्यातील ओझोन रुग्णालयामध्ये ४ एप्रिलपर्यंत सर्वाधिक तब्बल ६१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्याची टक्केवारी १२.२ टक्के आहे. त्या खालोखाल आयकॉन रुग्णालयात ३० रुग्णांचे बळी गेले. आयकॉनची मृत्यूची टक्केवारी ६ टक्के आहे. बिघाडे रुग्णालय व हॉटेल रिजेन्सी येथे प्रत्येकी १० रुग्णांचे मृत्यू झाले. अकोला अ‍ॅक्सिडेंट क्लिनिक, नवजीवन रुग्णालय, सहारा रुग्णालय, इंदिरा रुग्णालयात प्रत्येकी दोन, तर सूर्यचंद्रा रुग्णालय, क्रेस्टल रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा बळी गेला. वर्धा येथील सावंगी मेघे, जळगाव येथील गणपती रुग्णालय व नागपूर येथील खासगी रुग्णालयात देखील अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात मृत्यूदर १.६२ टक्क्यांवर आहे. करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.

‘धोका अधिक, लस मात्र नाहीच’

३१ ते ४० वयोगटात करोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र, या वयोगटासाठी अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. केंद्र शासनाच्या आदेशानुसार ४५ वर्षांपेक्षा जास्त नागरिकांनाच लसीची मात्रा देण्यात येत आहे. ४५ वर्षांच्या आतील नागरिकांसाठी धोका कायमच आहे.

दोन ते तीन दिवसांच्या उपचारात १२७ मृत्यू

जिल्ह्यात करोनाबाधित आढळल्यावर दोन ते तीन दिवसांच्या उपचारामध्ये १२७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. २४ तासांच्या आत ६२ रुग्ण, चार ते पाच दिवसांमध्ये ९६, सहा ते १० दिवसांमध्ये ११७ तर ११ पेक्षा जास्त दिवस उपचार करण्यात आल्यावरही ९७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

सर्वाधिक मृत्यू झालेले रुग्णालय (४ एप्रिलपर्यंत)

रुग्णालय                                मृत्यू

अकोला जीएमसी          –          ३७१

ओझोन रुग्णालय           –          ६१

आयकॉन रुग्णालय         –          ३०