उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्ब-ए-बारात तसंच हनुमान जयंतीला घराबाहेर पडू नका असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. “लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला करोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुस्लीम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातंच थांबावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“करोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- उद्धव ठाकरेंच्या बंगल्याबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ, सुरक्षा रक्षक अलगीकरणात

“करोनाच्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल. करोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. करोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.

आणखी वाचा- लॉकडाउन शिथिल होईल असं कुणीही डोक्यात ठेवू नये; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट

जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा
अजित पवार यांनी जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्तानं राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं महत्वं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे की, “’आरोग्यम् धनसंपदा’, आरोग्यासारखं धन नाही असं मानणारी आपली संस्कृती आहे, परंतु जागतिकिकरणाच्या काळात, आधुनिक जीवनपद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं, सार्वजनिक, जागतिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे हे ‘करोना’संकटाच्या निमित्तानं आपल्या पुन्हा एकदा लक्षात आलं आहे. यापासून धडा घेऊन भविष्यात वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणसाठी आपण सर्वजण कटीबद्ध होऊया”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus deputy cm ajit pawar appeal people to stay home sgy
First published on: 07-04-2020 at 12:07 IST