“तुम्ही योग्य मार्गावर आहात,” अशा शब्दांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र सरकार घेत असलेल्या करोनासंदर्भातील निर्णयांबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. राज्याचे आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली.

राज्यामध्ये करोनाचे सर्वाधिक म्हणजेच ४२ रुग्ण अढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील करोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहान प्रशासनाने केले आहे.तसेच इतरही अनेक निर्णय राज्य सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेतले आहेत. याचसंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली. राज्य सरकारकडून घेण्यात येणारे निर्णय आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजना पुरेशा आहेत का अशाप्रकारचा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य मंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी आजच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी आपले बोलणे झाल्याचे सांगितले. “और कुछ कराना बाकी है तो बोलीऐ?,” असा सवाल आपण केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विचारल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं. “राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या वाटत असल्याने चिंता वाटतं आहे असं मी हर्षवर्धन यांना सांगितलं. तसेच आणखीन काही उपाययोजना करायच्या असल्यास त्याबद्दल सांगावे असंही मी त्यांना म्हटल. त्यावर त्यांनी मला, ‘आप सही रास्ते से जहा रहे है. कुछ गडबड नही होगी, कुछ प्रॉब्लेम नही आऐगा’ असं उत्तर दिलं,” अशी माहिती टोपे यांनी पत्रकारांना दिली.

राज्यामधील करोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने दुबईवरुन आलेल्या गटामुळे झाला असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यामध्ये सर्व ती खबरदारी राज्य सरकारने घेतली आहे असंही टोपे यांनी सांगितलं. मात्र इतकं करुनही सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी झाली नाही तर मुंबईमधील लोकल ट्रेनची सेवा काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा कठोर निर्णय सरकार घेऊ शकतं असे स्पष्ट संकेतही टोपे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिले.

पुण्यातील अधिकाऱ्यांचे कौतुक

सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी टाळण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांनी पीएमटीच्या बसेसची संख्या टप्प्या टप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे टोपे यांनी कौतुक केलं.