करोनाचं संकट अद्यापही टळलेलं नसल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. याआधी मार्च महिन्यात निवडणुका पुढे ढकलत असल्याची घोषणा केली होती. पण अद्यापही करोनाचं संकट पूर्णपणे टळलं नसल्याने निवडणुका अजून तीन महिने पुढे ढकलण्याची घोषणा कऱण्यात आली आहे. यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, गोकूळ सारखे दूध संघ, बाजार समित्या, साखर कारखाने, गृहनिर्माण संस्था अशा अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका आता सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत.

राज्यात डिसेंबर २०१९ अखेर १६ हजार ३७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. तर यावर्षी डिसेंबर अखेर ३० हजार ५४ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका,साखर कारखाने, दूध संघ अशा सहकरी संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत सत्तासंघर्ष उफाळून येत असतो. पण करोनामुळे सध्या या निवडणुका लांबणीवर पडत आहेत.