नागपूर, अमरावती, यवतमाळ या कोरोना बाधित जिल्ह्यातून आडमार्गाने वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांना येण्यास प्रतिबंध करण्यासाठी आता प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली व युवकांच्या सहभागासह गावस्तरीय करोना निगराणी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकांमार्फत आता गावात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना अटकाव करून त्यांना गावात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये ठेवण्यास सहकार्य होईल अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली.

आजपर्यंत नागरिकांच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. आजूबाजूच्या तीन जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. नागपूर, यवतमाळ आणि अमरावती हे तिन्ही जिल्हे रेड झोन मध्ये आले आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील सतर्कता वाढली आहे.

जिल्ह्यात चोरमार्गाने प्रवेश करणाऱ्यांची संख्या रोज शंभर, दोनशेने वाढत आहे. आतापर्यंत 18 हजार 509 नागरिक इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आले आहेत. यातील अनेक नागरिकानी आडमार्गाने जिल्ह्यात प्रवेश केला आहे. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय असे नागरिक वर्धा जिल्ह्यात येत राहिल्यास जिल्हा कोरोना बाधित होण्यास वेळ लागणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आता अशा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखण्याची जबाबदारी गावातील नागरिकांवर सोपवली आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निगराणी पथक स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी भीमानवर यांनी सांगितले,

या पथकात गावातील 10 ते 15 व्यक्तींचा प्रामुख्याने युवकांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक 24 तास निगराणी करेल. गावात येणारे सर्व रस्ते, आडमार्ग प्रवासी वाहतुकीस बंद करतील. गावात अवैध मार्गाने येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवतील. शासनाची (सक्षम अधिकाऱ्यांची ) परवानगी नाही अशा ग्रामस्थांना, नागरिकांना गावामध्ये प्रवेश नाकारतील, व त्यांची माहिती संबंधित तहसीलदार, ठाणेदार यांना तात्काळ देतील. कोरोनाच्या प्रतिबंधित कालावधीत गावात वास्तव्याला नसणारे आणि आता अवैधपणे प्रवेश करणाऱ्या नागरिकांना सुद्धा प्रवेश नाकारतील व याबाबत प्रशासनास कळवतील.

यासोबतच गावात भीतीचे किंवा संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही यासाठी समुपदेशन करण्याची जबाबदारी सुद्धा या पथकाकडे राहील. आज यासंदर्भात जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबसें यांनी झूम मीटद्वारे सर्व सरपंचांशी संवाद साधून त्यांना निगराणी पथकाचे काम आणि जबाबदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.