वर्धा जिल्ह्यात नागपूर, यवतमाळ, आणि अमरावती या कोरोना बाधित जिल्ह्यातून नागरिक चोरट्या मार्गाने प्रवेश करीत आहेत. येणाऱ्या नागरिकांकडून संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात 16 ठिकाणी तपासणी नाके आहेत. येथे रीतसर परवानगी असणाऱ्या लोकांना प्रवेश दिला जातो. परवानगी नसणाऱ्या अनेकांना या नाक्यावरून परत पाठविले जाते. मात्र नागरिक नाक्यावरून परत पाठविल्यानंतर छुपे मार्ग शोधून जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा नागरिकांकडून वर्धा जिल्हा कोरोना बाधित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी प्रशासनाने यवतमाळ, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणारे 98 छुपे मार्ग शोधून काढले आहेत. यामध्ये यवतमाळकडून येणारे चोरटे मार्ग जास्त आहेत. यवतमाळ मधील कोरोना बाधितांचा वाढता आकडा बघता हा निर्णय जिल्ह्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. शोधण्यात आलेल्या छुप्या मार्गामध्ये चारचाकी, दुचाकी, पायी, नदी मार्ग अशा सर्वच मार्गाचा समावेश आहे. या सर्व मार्गावर इतर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा घेऊन तपासणी पथक तैनात करण्यात येत आहे.

याशिवाय गावातील तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कोतवाल या ग्रामस्तरीय यंत्रणेला गावात चोरट्या मार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांना थांबविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या ग्रामस्तरीय यंत्रणेने तात्काळ अशा व्यक्तींना बाहेरच थांबवून त्यांची माहिती आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासनाला तात्काळ काळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावात कोरोना बाधित जिल्ह्यातून प्रवेश करणारी व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर यापुढे गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या नातेवाईक, आणि मित्र परिवाराला जिल्ह्यात येण्यापासून परावृत्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.