सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये करोनाबाधित पहिला रुग्ण आढळला असून शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. १८ मार्च रोजी मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना कर्नाटकमधील करोनाबाधित रुग्णाशी संपर्क आल्याने या व्यक्तीला लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे. त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

कोकण रेल्वेच्या मंगलोर एक्स्प्रेसमधून १८ मार्च रोजी कणकवलीत आलेल्या सहाजणांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी २२ जणांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्या सहा प्रवाशांपैकी हा रूग्ण आहे. त्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व प्रवाशांना आरोग्य तपासणी करून कणकवली येथील विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवले आहे.