करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण करणारे द्रावण अंगावर फवारणी करणारा बोगदा (टनेल) निर्माण करण्यात आल आहे. हा उपक्रम राज्यात प्रथमच चार लाख लोकसंख्येच्या औद्योगिक शहर असलेल्या इचलकरंजीमध्ये सुरू करण्यात आला आहे. सध्या हा उपक्रम प्रायोगिक रूपात सुरू करण्यात आला आहे. मात्र त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. शास्त्रोक्तदृष्ट्या परिपूर्ण अशा स्वरूपाचा हा बोगदा बनवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध स्वरूपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यातून गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दूध,औषध, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक बाहेर पडतात. अशा गर्दीच्या वेळी एकमेकाच्या संपर्कातून कोणाला बाधा होऊ नये यासाठी एक अभिनव उपक्रम इचलकरंजीत सुरू करण्यात आला आहे.

याची तांत्रिक निर्मिती बॉम्बे क्रेनचे अरुण यादव यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की ‘यासाठी एक विशेष स्वरूपाचा बोगदा बनवण्यात आला आहे. पाच फूट रुंद, सोळा फूट लांब व आठ फूट उंचीचा हा बोगदा आहे. त्याच्यामध्ये सहा ठिकाणी ‘नोजल’ लावण्यात आले आहेत. एका ‘नोजल’ मधून चार ठिकाणाहून म्हणजे एकूण 32 छिद्रातून निर्जंतुकीकरण द्रावण ठिबक स्पिंकलरद्वारे बोगद्यातून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर फवारले (फॉगी शॉवर) जाते.

तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे –

हा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या ‘कल्लाप्पांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी शेडूल बहुराज्य बँक’ आणि शहरातील दुसर्‍या क्रमांकाची ‘सन्मती सहकारी बँक’ यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात येत आहे. याबाबत सन्मती बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितले की, ‘यासाठी पाण्यात मिश्रण केले जाणारे सोडियम हाइपोक्लोराइट किंवा शास्त्रोक्तदृष्ट्या योग्य अशा निर्जंतुकीकरण घटकाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी तिरुपुर येथील काही जाणकार, केमिकल इंजिनियर सुरेश पाटील, जयदीप मोघे यासह तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.

२१ ठिकाणी व्याप्ती –

आवाडे जनता बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, करोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आम्ही विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. इचलकरंजी गारमेंट क्लस्टरच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे १ लाख मास्क बनवून ते पोलीस, आरोग्य तसेच करोनाच्या प्रतिबंधासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लोकांना मोफत पुरवले आहेत. आता अंग निर्जंतुकीकरण करणारा बोगदा बनवला आहे. या बोगद्याच्या ठिकाणी ५०० लिटरची टाकी बसवण्यात आली आहे. त्यामध्ये निर्जंतुकीकरण द्रावण असणार आहे. बोगद्यातून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर त्याची धुक्याप्रमाणे फवारणी केली जाईल त्यातून गेल्यानंतर शरीर निर्जंतुक होईल. याद्वारे अशा लोकांना करोनाचा संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. इचलकरंजीत २१ ठिकाणी भाजी मंडई सुरू असून त्या सर्व ठिकाणी असा बोगदा उभारण्याचा संकल्प आहे, असे आमदार आवाडे यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.