रायगड जिल्ह्यात शुक्रवारी करोनाचे पाच रुग्ण आढळून आले. पनवेल येथील चौघांना तर श्रीवर्धनमधील एकाला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ३७ वर पोहोचली आहे.

मागील दोन दिवस जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता, मात्र शुक्रवारी एकदम पाच रुग्ण आढळून आले. श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात ४९ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. ते मुंबईतील वरळी येथून गावात राहण्यासाठी आले होते. मात्र करोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशाचे नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हा तपासणी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यात त्यांना करोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही आता तपासणी केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

रायगड जिल्ह्यात पनवेल आणि उरण तालुके वगळता आत्ता पर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आता मात्र श्रीवर्धन तालुक्यात करोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळात मोठ्या संख्येनी मुंबईतून लोक दाखल झाली आहेत. त्यामुळे या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी आता केली जात आहे.