फसवणूक करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कुठल्याही परिस्थितीत संधी शोधत असतात याचेच उदाहरण म्हणजे लॉकडाउनच्या काळातही येणाऱ्या ऑनलाईन मद्यविक्रीच्या जाहिराती. अशा प्रकारे मद्य घरपोच देण्याचे आमिष दाखवले जात असून पैसे एकदा ऑनलाइन मिळाले की हेच लोक संपर्क क्षेत्राच्या बाहेर होतात. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिरातींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच फसवणूक झाली असेल तर याबाबत सायबर सेलशी संपर्क करावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अगोदर राज्य शासनाने ३० मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर केला त्यानंतर हा लॉकडाउन केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत वाढवला. यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. मात्र, मद्य विक्री अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने त्याच्या विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात आले. दरम्यान, अनेकांनी दारुची दुकानं काही वेळेसाठी तरी खुली ठेवावीत अशा मागण्या केल्या होत्या. लोकांची मागणी लक्षात घेता काही फसव्या लोकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरुन घरपोच दारु मिळेल अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या.

अशा या जाहिरातींना भुलून अनेकांनी स्वतःची फसवणूक करून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मद्य खरेदी प्रकरणात आपली फसगत झाली म्हणून कोणी पोलिसांच्याकडे कोणी जाणार नाही. याच कारणाने फसवणूक करणाऱ्याचे फावते आहे. रक्कम छोटी म्हणून कोणी पोलिसांच्या कडे जात नसावे, अशी शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नागरिकांना  http://www.reportphishing.in, http://www.sybercrime.gov.in या संकेस्थळावर आपल्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे. सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरीया यांनी ही माहिती दिली.

ऑनलाइन मद्यविक्रीच्या जाहिरातीद्वारे अशी होते फसवणूक

घरपोच मद्य पोहोचवण्याबाबत फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरुन जाहिराती करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमधील लिंकवर भेट दिली असता विविध ब्रँड आणि त्याचं प्रमाण व किंमती दिसतात. आपल्या गरजेनुसार मागणी नोंदवून ऑनलाइन पेमेंट करावे लागतात. अशा प्रकारे पैसे एकदा जमा झाले की मद्य तर घरी पोहोचत नाही उलट वेबसाईटवर असलेला फोन क्रमांकही नॉट रिचेबल होतो.