वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी आज आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केल्याने उसळलेल्या गर्दीमुळे संताप व्यक्त होत आहे. उपक्रम राबविण्यात तत्पर म्हणून ओळख असणाऱ्या आमदार केचे यांचा आजचा उपक्रम त्यांच्या चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. राज्यात सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत असताना हा प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढदिवसानिमित्तानं गोरगरिबांना धान्यवाटप करण्याचे आमदार केचे यांनी जाहीर केले होते. त्यासाठी शनिवारी वार्डावार्डात सायकल रिक्षाद्वारे दवंडी पिटण्यात आली होती. ही माहिती असल्याने केचे यांच्या बंगल्यापुढे आज सकाळपासूनच रांगा लागणे सुरू झाले. गहू, तांदूळ व अन्य किराणा स्वरूपात पिशव्या तयार होत्या. मात्र, गोरगरीबांची गर्दी वाढतच चालल्याने शेवटी एका सूज्ञ व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगविली. धान्यवाटप बंद करण्यात आले. केचेंच्या घराला लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान, काही पोलीस कर्मचारी केचेंच्या घराजवळ तैनात करण्यात आले आहेत. मात्र ही घटना जमावबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे. या संदर्भात आ. केचे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

यासंदर्भात आर्वी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक म्हणाले, “या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी प्रशासनाकडून घेण्यात आली नव्हती. या संदर्भातील चौकशी अहवाल तयार करुन पुढील कारवाईचा विचार केला जाईल.”

विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी खासदार रामदास तडस यांचा वाढदिवस साजरा झाला होता. परंतू त्यांनी खबरदारी घेत गरजूंना घरोघरी जावून धान्यवाटप केले होते. खासदारांचे उदाहरण आमदारांनी डोळ्यापुढे ठेवले असते तर कायद्याचे उल्लंघन झाले नसते, अशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात सुरु आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus grains distrubution by bjp mlas in vardha on the occastion of his birthday but big crowd present for that aau
First published on: 05-04-2020 at 11:49 IST