राज्यात आणि देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. २१ दिवसांच्या कालावधीत लोकांना घरातच थांबावं, असं आवाहनही सरकारकडून वारंवार करण्यात आलं. २१ दिवसांचा लॉकडाउनला अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत. मात्र, देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाउन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे. “१५ एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे शिथिल होईल, असं कुणीही गृहित धरू नये,” असं टोपे यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सायंकाळी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,”जगातच करोनाची साथ आलेली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर लॉकडाउन शिथिल कसा करायचा यासंदर्भात काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र सरकार अभ्यास करून राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना पाठवत असते. त्यानुषंगाने राज्य सरकार काम करते. त्यामुळे दहा आणि १५ एप्रिलच्या दरम्यान जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास करून त्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्र सरकारचे सल्लागार यांच्या अनुषंगानं ठरवावं लागेल. परंतु एक निश्चित आहे की, संपूर्ण लॉकडाउन उठेल, असं कुणीही डोक्यात ठेवू नये. शंभर टक्के यामध्ये काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे लॉकडाउन १५ एप्रिलनंतर शंभर टक्के शिथिलच होईल, असं कुणीही गृहित धरू नये,” असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

गरज पडली तर खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर घेणार

करोना विषाणूवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’(पीपीई)ची गरज आहे. राज्य सरकारने त्याची परस्पर खरेदी करू नये, असे निर्देश दिले असल्याने मागणी नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रमाणित असणाऱ्या तीन पीपीई उत्पादक कंपन्यांनी त्याचे उत्पादन वाढवावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र गरज भासल्यास  दक्षिण कोरिया अथवा चीनमध्ये स्वतंत्र विमान पाठवून पीपीई आणता येतील काय, याची तयारी सुरू केली आहे. पालघर तालुक्यातील प्राइम वेअर ही कंपनी टाळेबंदीमध्ये काही दिवस बंदच होती. ती सुरू करण्यासाठी तेथील कामगारांना स्वतंत्र सुरक्षा पास देण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात होणारी करोना विषाणूची बाधा हा चिंतेचा विषय नाही तर त्याचा मृत्यूचा दर वाढतो आहे, ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला  सांगितले. याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना मान्य असणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांतील व्हेंटिलेटर सरकारला लागले तर ताब्यात घेता येतील. त्यामुळे व्हेंटिलेटरची कमतरता भासणार नाही, असेही टोपे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus healht minister rajesh tope says dont assume complete withdrawal of lockdown in maharashtra bmh
First published on: 07-04-2020 at 06:45 IST